घाटकोपर : ऑनलाइन जॉब पोर्टलवर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची ऑनलाइन फसवणूक करून लाखो रुपये लुटणाऱ्या नकली कॉल सेंटरचा मुंबई पोलिसांनी पडदा फाश केला. घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी दिल्लीवरून या कॉल सेंटर मधील पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या असून पाच महिलांना नोटीस देण्यात आली आहे.


एखाद्या जॉब पोर्टलवर जर तुम्ही आपला ड्रीम जॉब शोधत असाल तर स्वतःची माहिती पुरविताना सतर्क राहा. कारण कदाचित यामुळे तुमची आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते. अशाच पद्धतीने नोकरी देण्याच्या बहाण्याने घाटकोपरमध्ये एका महिलेची तब्बल साडेआठ लाखांना फसवणूक झाली. या महिलेने घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करताच पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर या गुन्ह्याशी संबंधित दिल्लीपर्यंत पाळंमुळं खणून काढली. यात एक नकली कॉल सेंटर मधील पाच जणांना गजाआड केलं आहे.


गरजूंना लुटण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर


या आरोपींनी आपलं सावज शोधण्यासाठी शाईन डॉट कॉम या मोबाईल अॅपचा वापर केला. या मोबाईल ॲपवर अपलोड झालेले रिझ्युम वरील मोबाईल नंबरवर संपर्क करून अर्जदाराला बोगस कॉल सेंटर वरून कॉल केला जायचा. त्याच्याशी एखाद्या नोकरी संदर्भात बोलता-बोलता त्याच्या बँकेचे डिटेल्स देखील विचारले जायचे. बँकेची डिटेल मिळाल्यानंतर आरोपींकडून एक ओटीपी जनरेट केला जायचा हा ओटीपी अर्जदाराच्या मोबाईल नंबर वर आल्यानंतर अर्जदाराने तो ओटीपी क्रमांक कस्टमर केअरला सांगायचा आणि काही मिनिटातच अकाउंट मधून रक्कम गायब केली जायची.


पाच आरोपींसह मुद्देमाल जप्त


पोलिसांनी ज्या पेटीएम कार्डवरून ही रक्कम वजा झाली आहे. त्या पेटीएम कार्डच्या माध्यमातून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला आणि दिल्लीतून चालणारं बोगस कॉल सेंटर पोलिसांनी दिल्लीमध्ये जाऊन उध्वस्त केलं. अशीक इकबाल मोहम्मद (वय 27), राहुल तीलकराज (वय 21), रवी ओकला (वय 24), देवेशकर सिंह (वय 23), आदित्य सिंग (वय 32) या पाच आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याकडून 8 हार्ड डिस्क, 23 मोबाईल, 47 सिम कार्ड, 12 डेबिट कार्ड, 11 पेटीएम कार्ड, 7 डोंगल आणि 1 लाख 74 हजार रुपये हस्तगत केले आहेत. ऑनलाइन जॉब पोर्टल वर नोकरी शोधताना आपल्या बँकेच्या संदर्भातील डिटेल्स शेअर न करण्याचं आवाहन या घटनेनंतर पोलिसांनी केलं आहे.


ऑनलाइन जॉब पोर्टल वर नोकरी शोधणारे मोठ्या प्रमाणत आहेत. याचा फायदा घेऊन बनावट पोर्टल बनवून गरजूंची माहिती घेत त्यांना मोठ्या प्रमाणत लुटले जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने या बाबत नागरिकांनीही जागरूक रहाणे गरजेचे आहे.

मुलगी पाहायला बोलावलं अन् निर्जनस्थळी नेऊन लुटलं! अकोल्यातील धक्कादायक प्रकारानंतर तिघांना अटक