मुंबई: बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड (Fake Aadhaar Card) आणि पॅनकार्ड बनवणाऱ्या टोळीतील एका आरोपीला मुंबई गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय आधार कार्ड बनवण्याचं काम अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून केलं जायचं.  गोरेगाव पोलिसांनी आरोपीच्या कार्यालयातून 30 हून अधिक बोगस आधार कार्ड आणि 15 बोगस पॅनकार्ड जप्त केले आहेत. यामागे आणखी काही आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी आरोपीच्या कार्यालयातून बोगस कागदपत्रांसह प्रिंटर, कॉम्प्युटर आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याशिवाय आरोपींकडून अशी आधारकार्डेही जप्त करण्यात आली असून, त्यावर एकाच नावाने 50 हून अधिक आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवण्यात आले आहेत. ज्यामध्ये बहुतांश कार्डे हिंदूच्या नावाने तर कागदपत्रे मुस्लिमांच्या नावावर असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारचे फेक आधारकार्ड तयार करण्यासाठी हा आरोपी 50 हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे. 


विशेष म्हणजे उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांच्या आदेशाने सर्व पोलीस ठाण्यांना बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  या आदेशानंतर गोरेगावचे वरिष्ठ पीआय दत्तात्रय थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीसीचे पथक सातत्याने तपास करत होते.  या तपासादरम्यान गोरेगाव परिसरात एक व्यक्ती कोणत्याही कागदपत्रांशिवाय अकराशे रुपयांना आधारकार्ड आणि पॅनकार्ड देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  


पोलिसांनी डमी ग्राहक बनवून त्याला प्रेम नगर येथील श्याम नारायण मिश्रा यांच्या सार्वजनिक सेवा केंद्रात पाठवले. तेथे आरोपी श्याम मिश्रा याने त्या ग्राहकाकडून 1100 रुपयांमध्ये आधार कार्ड बनवण्याचे आश्वासन दिले.  मिश्रा यांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय ग्राहकाचे आधार कार्ड बनवले असता गोरेगाव पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून आरोपी मिश्रा यांच्या केंद्रावर छापा टाकला. तेथून वेगवेगळ्या नावांची 30 हून अधिक बोगस आधारकार्ड आणि बोगस पॅनकार्ड जप्त करण्यात आले.


आधारबाबात सावधानतेचा इशारा 


विविध योजनांसाठी, कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स जमा करून घेतली जाते. केंद्र सरकारने आधार कार्ड बाबत महत्त्वाचे आदेश काढले आहेत. या नव्या सुचनेनुसार आधार कार्डची झेरॉक्स कुठेही जमा न करण्यास सरकारने म्हटले आहे. आधार कार्डचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने हे आदेश काढले आहेत. एखाद्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स अत्यावश्यक असल्यास आधारकार्डचा Masked असलेली झेरॉक्स द्यावी, अशी सूचना सरकारने केली आहे.