मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर चांगलीच जुंपल्याचं दिसून येतंय. राज्यातील बाहेर जाणारे उद्योग असो वा महाराष्ट्रातील राज्यांवर कर्नाटकने केलेला दावा असो, आणि त्यानंतर पुन्हा एकदा तापलेला सीमा प्रश्न असो, या सर्व मुद्द्यांवरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. यातच आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अनुवादीत केलेल्या 'सिटीझनविल' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर येणार होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस तर आले, पण अजित पवारांनी मात्र दांडी मारल्याचं दिसून आलं. त्यानंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळल्याची चर्चा सुरू झाली.
कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहिलेल्या 'सिटीझनविल' या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी केला आहे. त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात एकत्र व्यासपीठावर येणार होते. बऱ्याच काळानंतर हे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण अजित पवारांनी मात्र या कार्यक्रमालाच येण्याचं टाळलं.
Devendra Fadnavis and Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात अंडस्टॅडिंग?
राज्याच्या राजकारणात भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यामध्ये एक प्रकारचं अंडस्टॅडिंग असल्याचं राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. त्यातूनच त्यांनी एकदा सत्ता स्थापनेचा प्रयत्नही केला होता, पण तो अयशस्वी झाला. नंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतानाही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध तसेच होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजपने शिवसेना फोडली आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता असं वाटत असेल की त्यावेळचा शपथविधी योग्यच होता.
Ajit Pawar: अजित पवारांना नेहमीच खंत?
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाली होती. पण त्यावेळी अजित पवारांच्या भूमिकेला खुद्द शरद पवारांचाच विरोध असल्याने हे सरकार टिकलं नाही. ही गोष्ट अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा असते. त्यामुळेच अजित पवार सातत्याने पक्षात नाराज असल्याच्याही चर्चाही असतात.
एकीकडे शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीशी संधानही बांधायला सुरू केलं होतं असं नंतरच्या काळात समोर आलं. पण काही कारणांमुळे त्याला यश न आल्याने शेवटी शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केल्याचं भाजपच्या एका नेत्याने वक्तव्य केलं होतं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र भाजपमधील आणि सरकारमधील एका गटाला फडणवीस आणि अजित पवारांचे असलेले अंडस्टॅडिंग कुठेतली बोचत होतं. राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी आणि भविष्यात गरज लागलीच तर वापर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची फाईल उघडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चाही सुरू झाली.
त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडल्या. राज्यातून अनेक उद्योग गुजरातला गेले, राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आणि सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापला. या सर्व गोष्टींवरुन विरोधी पक्षांनी, खासकरून शिवसेनेने सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. अजित पवारांनीही अनेक प्रश्नांवर शिंदे सरकारवर टीका केली. अजित पवारांचा टीकेचा रोख खासकरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरच राहिला आहे.
आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या या धुरळ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मुंबईतील कार्यक्रमात एकत्र येणार असं वाटत असतानाच अजित पवारांनी याला दांडी मारली. मग आजच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी का मारली, त्यांनी फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्याचं का टाळलं याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.