कोण आहे वैभव राऊत?
-40 वर्षीय वैभव राऊतचं शिक्षण 14 वी पर्यंत झालं.
-वैभव विवाहित असून 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे.
-व्यवसाय - इस्टेट एजंट
-गेल्या 6 वर्षांपासून सनातन संस्थेशी संबंधित आहे.
-सक्रिय गोरक्षक आहे.
-सनातन संस्था दावा करते की ते त्याच्यासाठी कायदेशीर मदत करतील
-9 वकील संघ तयार आहेत.
वैभव राऊतच्या घरातून स्फोटकांचा साठा जप्त
मिळालेल्या माहितीनुसार एटीसने टाकलेल्या या धाडीत वैभव राऊतच्या नालासोपाऱ्यातील घरात 8 देशी बॉम्ब मिळाले आहेत. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर याठिकाणी मिळाले आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात.
सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटकं कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे.
एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप्स मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला.पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.
एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे.
सनातनच्या वकिलांची प्रतिक्रिया
वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता, त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एबीपी माझाला दिली.
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातही पोलिसांनी अनेक हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना पकडलं होतं, त्याचा निकाल काय लागला? दहा वर्ष आम्ही खटला चालवला, पोलिसांची भूमिका संशयित होती हे सिद्ध झालं. वैभव राऊतही चांगला माणूस आहे. त्याच्या घरी असं काही सापडणं शक्य नाही. वैभव राऊतला कोणी पकडलंय, त्याला कुठे ठेवलंय याची माहिती नाही. हा पोलिसांचा कट वाटत आहे. वैभव राऊतकडे असं काही सापडणं शक्य नाही. माझा महाराष्ट्र पोलिसांवर, एटीएसवर विश्वास नाही. सकाळी 11 वा. आम्ही कोर्टात जाऊन माहिती घेऊ. वैभव राऊत आणि त्याच्या कुटुंबाला जी मदत लागेल ती करु. मालेगाव बॉम्बस्फोटात काय झालं हे आम्ही पाहिलंय, स्फोटकं पकडलेला कार्यकर्ता निर्दोष निघाला, पोलिस काय करतात हे माहित आहे, असं संजीव पुनाळेकर यांनी सांगितलं. VIDEO: मुंबई: वैभव राऊतच्या घरी स्फोटकं, सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांची प्रतिक्रिया
हिंदू जनजागृती समितीचं स्पष्टीकरण
वैभव राऊत हे एक धडाडीचे गोरक्षक असून ते ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते. ते हिंदू जनजागृती समितीच्या सर्व हिंदू संघटनांच्या एकत्रिकरणातून केल्या जाणार्या हिंदू संघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असत; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता, असे हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे सिद्ध झाले आहे. आज येत असलेलं वृत्त पाहता वैभव राऊत यांची अटक ही ‘मालेगाव पार्ट 2’ आहे की काय, अशी शंका येत आहे, असं सुनील घनवट यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
संबंधित बातमी
'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, नालासोपाऱ्यात ATS ची धाड
नालासोपारा: वैभव राऊतच्या घरी स्फोटकं, सनातन संस्था आणि वादाची पार्श्वभूमी
नालासोपारा : ATS ची धाड, सनातनचा साधक वैभव राऊत अटकेत