मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात एका व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. महत्त्वाचं म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी  सनातन संस्थेशी संलग्न आहे.एटीएसने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली.


मिळालेल्या माहितीनुसार या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले आहेत. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात.

सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटकं कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे.

एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.

एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून  तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी  वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे.

सनातनच्या वकिलांची प्रतिक्रिया

वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता, त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया  सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एबीपी माझाला दिली.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातही पोलिसांनी अनेक हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना पकडलं होतं, त्याचा निकाल काय लागला? दहा वर्ष आम्ही खटला चालवला, पोलिसांची भूमिका संशयित होती हे सिद्ध झालं. वैभव राऊतही चांगला माणूस आहे. त्याच्या घरी असं काही सापडणं शक्य नाही.  वैभव राऊतला कोणी पकडलंय, त्याला कुठे ठेवलंय याची माहिती नाही. हा पोलिसांचा कट वाटत आहे.  वैभव राऊतकडे असं काही सापडणं शक्य नाही. माझा महाराष्ट्र पोलिसांवर, एटीएसवर विश्वास नाही. सकाळी 11 वा. आम्ही कोर्टात जाऊन माहिती घेऊ. वैभव राऊत आणि त्याच्या कुटुंबाला जी मदत लागेल ती करु. मालेगाव बॉम्बस्फोटात काय झालं हे आम्ही पाहिलंय, स्फोटकं पकडलेला कार्यकर्ता निर्दोष निघाला, पोलिस काय करतात हे माहित आहे, असं संजीव पुनाळेकर यांनी सांगितलं.