Mumbai Airport News Updates: पुण्याहून (Pune News) दिल्लीला (Delhi News) निघालेल्या अक्सा एअरच्या (Akasa Air) विमानात घडलेल्या एका प्रकारामुळे मुंबई विमानतळ (Mumbai Airport) प्रशासनाची पुरती झोप उडालेली. पुणे-दिल्ली विमानातून (Pune Delhi Flight) प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं विमानतळ पोलिसांना पळता भुई थोडी केली. सर्वात आधी या प्रवाशानं छातीत दुखत असल्याचा दावा केला. त्यामुळे विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र, प्रवाशाचं चेकअप सुरू असतानाच या पठ्ठ्यानं त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला. मुंबई विमातळ पोलिसांची भंबेरीच उडाली. 


मुंबई विमानतळ प्रशासनाकडून तात्काळ विमानतळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर तात्काळ बीडीडीएसमार्फत बॅगेची तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीनंतर प्रवाशाकडे कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. तसेच, प्रवाशानं दावा केलेल्या बॅगेतही काहीच आढळलं नाही. त्यामुळे बॉम्ब असल्याच्या सर्व अफवाच असल्याचं निष्पन्न झालं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


नेमकं काय घडलं? 


पुण्यावरून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाचं मेडिकल इमर्जन्सीमुळे मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं छातीत दुखत असल्याची तक्रार विमानातील क्रू मेंबर्सकडे केली आणि मुंबई विमान लँड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मुंबई विमानतळावर उतरताच छातीत दुखत असलेल्या प्रवाशाकडूनच त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला आणि विमानतळावर एकच गोंधळ उडाला. तातडीनं विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आलं आणि प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली. बीडीडीएस मार्फत बॅगेची तपासणी केली गेली. तपासणीनंतर प्रवाशाच्या बॅगेत काहीच आढळलं नाही. त्यामुळे काही वेळातच यासर्व अफवा असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी सदर प्रवाशी आणि त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली. औषधांच्या प्रभावामुळे प्रवासी असं बरळत असल्याचा दावा त्याच्यासोबत असलेल्या निकटवर्तीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत. 


घडलेल्या प्रकारासंदर्भात अक्सा एअरलाईन्सकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. अक्सा एअर फ्लाईट QP 1148 नं 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री पुण्याहून दिल्लीला उड्डाण केलं. विमानात 185 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच सुरक्षा सूचना प्राप्त झाली. सुरक्षा प्रक्रियेनुसार, विमान तात्काळ मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅप्टननं सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियांचं पालन केलं आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सुरक्षितपणं उतरवलं.