मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हॅनी बाबू यांची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे. हॅनी यांना डोळ्यांचा संसर्ग झाल्यानं मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा झाल्यानं 18 ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना पुन्हा तळोजा कारागृहात नेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.
भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी प्राध्यापक हॅनी बाबू यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तळोजा कारागृहात असतानाच मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आधी जे.जे. रुग्णालयात व नंतर जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यानंतर तिथून त्यांना ब्रीच कँण्डी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं. बाबू यांना डोळ्यांचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांची पत्नी जेनी रोवेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात बाबू यांना वैद्यकीय कारणांसाठी अंतरिम जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
हॅनी बाबूंच्या डोळ्यांच्या संसर्गामध्ये आता बरीच सुधारणा झाली असली तरीही त्यांच्या डोळ्यातून किंचित पाणी येत आहे तसेच सुजही आहे. अशी माहिती बाबूंच्यावतीने अॅड. पायोशी रॉय व अॅड. युग चौधरी हायकोर्टाला दिली. तसेच ब्रीच कँडी रुग्णालयानंही हॅनी बाबूंचा वैद्यकीय अहवाल कोर्टापुढे सादर केला. तेव्हा त्यांच्या तब्येतीत झालेली सुधारणा पाहता गरज भासल्यास नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्याच्या सूचना देत हायकोर्टानं त्यांची याचिका निकाली काढत हॅनी बाबूंना पुन्हा तळोजा कारागृहात हलवण्याचे निर्देश दिले आहेत.