मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा नकार दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला. मात्र डीएसकेंसोबत अर्ज केलेल्या त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मात्र हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. डीएसकेंचा जामीन फेटाळून लावल्याने या प्रकरणी ते आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
लोकांना जास्त पैशाचं आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना 2 हजार 43 कोटींना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांनी अॅड आशुतोष श्रीवास्तवा आणि अॅड रितेश येवलेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. जो जाहीर करताना हायकोर्टानं डीएसकेंना कोणताही दिलासा न देता त्यांची याचिका फेटाळून लावली. मात्र त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिलासा देत त्यांना जामीन मंजूर केला.
ठेवीदारांची देणी परत न करू शकल्याने पुणे पोलिसांनी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना 17 फेब्रुवारी 2018 ला अटक केली होती . तेव्हापासून म्हणजे गेली जवळपास साडेतीन वर्षे डीएसके आणि त्यांची पत्नी तुरुंगात आहेत. हजारो गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपये परत करू न शकल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
दुसरीकडे डी एस कुलकर्णींची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंची डीएस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी विकण्याची प्रक्रिया सुरु झालीय. ही कंपनी विकत घेण्यासाठी अजदान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 827 कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला असून तो रिझोल्युशन ऑफिसरने मान्यही केलाय. त्यामुळे डी एसकेंच्या मालकीच्या मालमत्ता विकण्याला गती येणार आहे. डी एस केंच्या 95 टक्के मालमत्ता या कंपनीच्या मार्फत खरेदी करण्यात आल्यात. मात्र ही कंपनी विकून येणाऱ्या 827 कोटी रुपयामधून आधी डी एसकेंना कर्ज देणाऱ्या बँकांची देणी फेडली जाणार की सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. डी एस कुलकर्णींवर वेगवगेळ्या बँकांचे मिळून 2200 कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर ठेवीदारांनी गुंतवलेली रक्कम 400 कोटी रुपयांच्या घरात आहे.