Mumbai Oxygen Plant Scam : मुंबईत कोविड कालावधीत झालेल्या कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याप्रकरणी (Mumbai Oxygen Plant Scam) ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखाने (EOW) ऑक्सिजन प्लँट प्रकरणी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता ईडीसुद्धा प्रकरणाचा तपास करणार आहे.


कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या जवळचा समजला जाणारा व्यापारी रोमन छेडा (Romin Chheda) याला अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे. छेडा आणि त्यांच्या कंपनीला पात्रता नसतानाही कंत्राट मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बीएमसीला 6 कोटी रुपयांचा फटका बसला आणि फसवणूक झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी बीएमसीच्या अनेक अधिकाऱ्यांनी छेडा यांना मदत केल्याचा आरोप आहे.


मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसापूर्वी ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याच्या संदर्भात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास करत रोमिन छेडा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 


या सर्व प्रकरणात गैरप्रकार झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रोमिन यांना अटक करत पुढील कारवाई सुरू केली. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पूर्णपणे तपास करत असून छेडा यांच्या कंपनीच्या माध्यमातून काही शेल कंपनींना पैसेसुद्धा ट्रान्सफर केले गेले असल्याचं समोर आलं आहे. त्याचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 


ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरण काय?


मुंबई पोलिसांनी 'एफआयआर'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात 30 दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. 


हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी ही उत्तर प्रदेश मधील कंपनी आहे. कोणतेही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट मिळवले. तसेच दिलेल्या 30 दिवसांच्या मुदती पेक्षा जास्त विलंबाने म्हणजेच ऑक्टोबर 2021 किंवा त्याही नंतर ऑक्सिजन प्लँट पालिकेला सुपूर्द केले. असे असूनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी छेडा यांच्याशी संगनमताने ते कंत्राट तर या कंपनीला दिलेच, पण प्लँट उभारणीला विलंब झाल्याने दंड देखील कमी आकारला. यामुळे पालिकेचे 6 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच अनेक ऑक्सिजन अभावी नाहक बळी गेले. 
 
ही बातमी वाचा: