Mumbai Oxygen Plant Scam : मुंबईतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणात (Mumbai Oxygen Plant Scam) अटक करण्यात आलेल्या  रोमिन छेडा (Romin Chheda) यांना 29 नोव्हेंबर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती.  रोमिन छेडा यांना दुसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

  


मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याप्रकरणी अधिक तपास करायचा असल्याने त्यांनी रोमिन छेडा यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शनचे मालक असून त्यांच्या कंपनीला ऑक्सिजन प्लँटचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. 


मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसापूर्वी ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याच्या संदर्भात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास करत रोमिन छेडा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 


या सर्व प्रकरणात गैरप्रकार झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रोमिन यांना अटक करत पुढील कारवाई सुरू केली. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पूर्णपणे तपास करत असून छेडा यांच्या कंपनीच्या माध्यमातून काही शेल कंपनींना पैसेसुद्धा ट्रान्सफर केले गेले असल्याचं समोर आलं आहे. त्याचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 


त्याचबरोबर रोमिन छेडा यांना कॉन्ट्रॅक्ट देताना कुठला राजकीय दबाव होता का हेसुद्धा तपासलं जात आहे. मात्र पोलिसांना अजूनपर्यंत याच्यामध्ये कुठलीही राजकीय लिंक सापडलेला नाही. मात्र याचे थेट संबंध हे माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी असून रोमिन छेडा हे त्याचे जवळचे मित्र असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. म्हणून ऑक्सिजन प्लँटचे कॉन्ट्रॅक्ट रोमिन छेडा यांना देण्यात आलेलं होतं असाही दावा त्यांनी केला.


ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरण काय?


मुंबई पोलिसांनी 'एफआयआर'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात 30 दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. 


हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी ही उत्तर प्रदेश मधील कंपनी आहे. कोणतेही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट मिळवले. तसेच दिलेल्या 30 दिवसांच्या मुदती पेक्षा जास्त विलंबाने म्हणजेच ऑक्टोबर 2021 किंवा त्याही नंतर ऑक्सिजन प्लँट पालिकेला सुपूर्द केले. असे असूनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी छेडा यांच्याशी संगनमताने ते कंत्राट तर या कंपनीला दिलेच, पण प्लँट उभारणीला विलंब झाल्याने दंड देखील कमी आकारला. यामुळे पालिकेचे 6 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच अनेक ऑक्सिजन अभावी नाहक बळी गेले. 


ही बातमी वाचा: