मुंबई :  मुंबई महापालिकेने (BMC) कोरोना काळात खरेदी केलेल्या डेड बॉडी बॅग (Dead Body Bag) खरेदी प्रकरणी ईडी (ED) आता अॅक्शन मोडवर आलेली आहे. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्याशिवाय, याच प्रकरणात ईडीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनीही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 


डेड बॉडी बॅग (Dead Body Bag) खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police EOW) आज माजी महापौर  किशोरी पेडणेकर यांची सप्टेंबर महिन्यात दोन तास चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ECIR दाखक केले होते.  माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतरांची देखील ECIR मध्ये नावं आहेत. कथित फसवणूकीची रक्कम सुमारे 49.63 लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ईडी चौकशीसाठी काहींना समन्स बजावू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली. अखेर ईडीने आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पेडणेकर यांना बुधवारी ईडीच्या चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे. 


मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल 


अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि माजी उपमहापालिका आयुक्त खरेदी/CPD), खाजगी कंत्राटदार वेदांत इनोटेक PVT आणि कोविड-19 महामारी दरम्यान फुगवलेल्या दराने बॉडी बॅग खरेदी करण्याच्या कथित घोटाळ्यातील अज्ञात इतर सरकारी नोकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे. 


कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेने बाजार भावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने ही डेड बॉडी बॅग खरेदी करण्यात आले असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांसह आता तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित घोटाळा प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने 5 ऑगस्ट रोजी पेडणेकर, कंत्राटदार वेदांत इनोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक आणि BMC च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या विरोधात साथीच्या काळात मृतांसाठी बॉडी बॅग खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.


ED चे सध्याचे प्रकरण (बॉडी बॅग घोटाळा) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) अधिकाऱ्यांनी पेडणेकर, नागरी अधिकारी आणि इतरांविरुद्ध 4 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे.  मृत कोविड-19 रूग्णांसाठी बॉडी बॅग खरेदीमधील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. पेडणेकर आणि इतर वरिष्ठ नागरी अधिकार्‍यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (लोकसेवक किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासाचा भंग करणे), 420 (फसवणूक) आणि 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


काय आहे प्रकरण?


किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. 


वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.