मुंबई : रस्त्यावर, मंदिरांमध्ये, रेल्वेस्थानकांवर असणाऱ्या भिक्षेकऱ्यांसाठी राज्य सरकारची एक योजना नव संजीवनी देणारी ठरत आहे. महिला व बाल विकास विभागाकडून एक हात पुढे करत, शासकीय पुरुष भिक्षेकरी गृह योजनेच्या माध्यमातून भिक्षेकऱ्यांना शेती, मत्स्यशेती, पॉलिहाऊस, फळबाग यांचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून उजाड जागेत हिरवळ फुलवून घेतली जात आहे. यातून रोजगाराचे तंत्र भिक्षेकऱ्यांना आत्मसात करण्याची संधी देण्यात येत आहे. 


अपुऱ्या शिक्षणामुळे तर कधी ओढावलेल्या एखाद्या संकटामुळे अनेकजण भिक्षा मागून पोट भरण्याचा मार्ग अवलंबतात. त्यात अनेकजण हे शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असतात. पण त्यातीलही काही जण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असतात. फक्त त्यांना संधी मिळत नाही म्हणून नाहीतर जबरदस्ती भीक मागायला लावली जाते म्हणून भीक मागूनच उदरनिर्वाह करतात. 


भविष्याचा कोणताच विचार न करता भिक्षा मागणाऱ्या या  भिक्षेकऱ्यासाठी एक नवं दालन अंबरनाथमधील जांभूळ गावात सुरू झालं आहे. अंगाने धडधाकट असलेल्या भिक्षेकऱ्यांना शासकीय पुरुष भिक्षेकरी गृहात शेती, फळबाग, पॉलिहाऊस, मत्स्य शेती, भाजीपाला अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जात आहे. 


जांभूळ गावात शासनाची सुमारे 70 एकर पडीक जमीन आहे. पूर्वी या गावात फारस कोणी फिरकत नव्हतं. भविष्यात या जमिनीवर अतिक्रमणाचा धोका लक्ष्यात घेऊन, दोन वर्षांपूर्वी महिला व बाल विकास विभागाने भिक्षेकऱ्यासाठी एका नाविण्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. मुंबई भिक्षेकरी प्रतिबंध कायदा 1958 नुसार भिक्षेकऱ्यांना स्वावलंबनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अशा मोकळ्या जागेवर प्रकल्प राबवण्याचा सूचना शासनाने दिल्या आहेत. या तरतुदीनुसार ओसाड जागेवर भिक्षेकऱ्यासाठी शेती लागवड, भाजीपाला, फळबागांचे मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण दिलं जात आहे. 


कोविड सुरू झाल्यापासून सर्वच भिक्षेकऱ्यांना जगणं अवघड झालं होतं. कारण रस्त्यावरच कुणी येत नव्हतं, ट्रेन बंद होत्या. याच काळात जांभूळ गावातील ओसाड जागेतील रान गवत, झुडपं काढून सपाटीकरण केलं गेलं. सुरुवातीला 15 गुंठ्यांत भात लावला जात होता. परंतु आता 15 ते 20 एकर जागेत भातशेती बनवली आहे. शिवाय 400 बांबूची, 400 शेगवा अशी झाड लावण्यात आली असून, पॉलिहाऊस मध्ये शिमला-भोपळा मिर्ची, काकडी टॉमेटोचं पीक काढलं जात आहे. 


आता 35 एकरच्या जागेत नंदनवन फुललं आहे. भिक्षेकऱ्यांनी 2 शेततळी देखील बनवली आहेत. शेतीसाठी सर्व अवजारे, ट्रॅक्टर, राईस मशीन, हार्वेस्टिंग मशीन आदी अत्याधुनिक गोष्टी याठिकाणी आहेत. भिक्षेकऱ्यांच्या या एका योजनेमुळे जांभूळ इथल्या केंद्रात आता 46 भिक्षेकरी राहत आहेत. त्यांना प्रशिक्षणासोबत चांगल्या राहणीमानाची पण सवय लावली जात आहे. जेणेकरून त्यांनी केंद्र सोडल्यानंतर देखील पुन्हा आधीच्या आयुष्यात न जाता त्यांना ताठ मानेने जगता येईल.