मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यासा सुरुवात करण्यात आली असून उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात आले आहे.


लग्न सोहळ्यांचे व्हिडिओ आता पोलिसांना पाठवणे बंधनकारक असणार आहे.  ठाणे शहरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागल्यानं महापालिकेसह पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे. शहरातील वाढत्या संसर्गाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी आता लग्न सोहळ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शहरांमधील विवाह सोहळ्यात आता केवळ 50 जणांच्या उपस्थितीला पोलिसांची परवानगी असणार आहे. विशेष बाब म्हणजे लग्न सोहळ्याच्या एक व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठवावा लागणार आहे. यामध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्यांचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


लग्न सोहळ्यांना उपस्थित राहणाऱ्या सर्वांना मास्क लावणे गरजेचे आहे. लग्न समारंभासाठी लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्या, असं दिसल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय, संबंधित व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दररोज किमान 5 लग्नाच्या सभागृह किंवा कार्यालयांवर धाडी टाकण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तिथे नियमांचं पालन होत नसल्यास आयोजकांसह कार्यालय व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील.


नितीन राऊतांचा स्तुत्य निर्णय, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह 19 फेब्रुवारी झाला. त्याचा स्वागत सोहळा 21 रोजी आयोजित करण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय राऊत कुटुंबियांनी घेतला आहे. कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता, हा सोहळा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता माझा मुलगा कुणाल आणि आकांक्षा यांच्या विवाहप्रित्यर्थ नागपुरात 21 फेब्रुवारी रोजी आयोजित स्वागत समारंभ तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय आम्ही राऊत कुटुंबियांनी घेतला आहे. निमंत्रितांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिर आहोत, असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे. काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री नितीन राऊत याचं भाषणात कौतुक केलं. राऊत यांनी लग्नाचा सोहळा रद्द केला. राऊत यांनी दाखवलेली जाणीव इतरही दाखवतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या :


राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे