मुंबई : दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीला मंगळवारी मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात हजर केलं. मुंबईतील गजाली रेस्टॉरंट गोळीबार प्रकरणी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयानं पुजारीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावत 9 मार्चपर्यंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.


अनेक वर्षांपासून फरार असलेल्या रवी पुजारीला मार्च 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला भारताकडे सोपाविण्यात यावे म्हणनू खटला चालवण्यात आला. तेव्हा, पुजारीवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्याला आमच्या ताब्यात द्या, असा युक्तिवाद मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. रवी पुजारीला भारतात प्रत्यार्पण करण्यात येत असतानाच मध्येच कर्नाटक पोलिसांनी एका खटल्याची कागदपत्र पुढे करून रवी पुजारीचा थेट ताबा मिळवला होता. मात्र अखेरीस कर्नाटक पोलिसांकडून पुजारीचा ताबा घेऊन मुंबई पोलीसांनी त्याला मंगळवारी मुंबईत आणलं.


साल 2016 मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली इथं खंडणीसाठी आलेल्या त्याच्या एका साथीदारानं एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात खटला दाखल केलाय. हा गोळीबार रवी पुजारीच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलिसांत यात ठेवलाय.


रवी पुजारी हा एक कुख्यात आंतरराष्ट्रीय गँगस्टर असून एकेकाळी मुंबईतील बिल्डर, बार मालक यांना रवी पुजारी आपल्या तालावर नाचवत होता. रवी पुजारीवर मुंबईत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. आता त्याचा ताबा मिळाल्यानं मुंबई पोलिसांना त्याच्याविरोधातील अनेक प्रकरणं कोर्टात चालवता येणार आहेत.


कोण आहे रवी पुजारी?


 रवी पुजारी हा मागील 20 वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरोधात सुमारे 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अनेक राज्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यात बंगळूरूत 39, मेंगलोरमध्ये 36, उड्डपीत 11, तर हुबळी-धारवाज,कोलाक, शिवमोगा, इथं प्रत्येक एक गुन्हा दाखल आहे. त्याव्यतिरिक्त मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे 78 गुन्हे दाखल आहेत. एकट्या मुंबईत 49 गुन्हे दाखल आहेत त्यात मोक्काचे 26 गुन्हे आहेत. मुंबई पोलीसांनी दाखल केलेल्या 10 मोठ्या गुन्ह्यांच्या आधारावर त्याला भारताच्या हवाली करण्यात आलं आहे.