मुंबई : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. मात्र शिरीष कुलकर्णी यांना 18 जूनपर्यंत अटकेपासून हायकोर्टानं दिलासा दिला आहे.
पुढील दहा दिवस दररोज तपास अधिकाऱ्यांपुढे हजेरी लावण्याचे निर्देश यावेळी हायकोर्टानं दिले आहेत. दोन हजार 43 कोटींच्या आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात डी. एस. कुलकर्णी त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह एकूण सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
लोकांकडून आलेला पैसा गैरमार्गानं आपल्या कुटुंबीयांच्या नावे वळवणं ही या संपूर्ण घोटाळ्याची कार्यपद्धती होती असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं.
डी. एस. कुलकर्णी यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांना अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट नकार दिला. शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळं ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, असं म्हणत आम्ही अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या असे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती साधना जाधव यांनी दिले होते.
शिरीष कुलकर्णी यांची पत्नी तन्वी कुलकर्णी यांनीही पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्याची माहिती मंगळवारच्या सुनावणीत हायकोर्टासमोर ठेवण्यात आली.
अनेक ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सध्या डी. एस. कुलकर्णीं, त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह एकूण सात जणांना अटक झाली आहे. यात मुख्यत्वे त्यांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश आहे. कारण आपल्या परिवारातील अनेकांच्या नावांवार डी. एस. कुलकर्णींनी आपले आर्थिक गैरव्यवहार व्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.