मुंबई : शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये चालले आहेत, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आत्मविश्वासाने सांगतात. खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत, अशी टीकाही दानवेंनी केली.


अर्जुन खोतकरांचं 'मातोश्री'वर इतकंही वजन नाही, की ते मला बंदी घालू शकतील. उलट त्यांनाच मातोश्रीवर भेटीसाठी तीन-चार तास वाट बघावी लागते, असा दावाही दानवेंनी केला.

काँग्रेसमधील काही लोकांसोबत खोतकरांच्या बैठका सुरु आहेत. याबाबत 'मातोश्री'वरही माहिती आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप करणारे खोतकर स्वतःच शिवसेना संपवायला निघाले आहेत, असंही दानवे म्हणाले. खोतकर काँग्रेसमध्ये चालले आहेत, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असंही दानवे आत्मविश्वासाने सांगतात.
दानवेंना सत्तेचा माज, माझ्यामुळे ते जमिनीवर : अर्जुन खोतकर

खोतकरांच्या गळ्यात शेळ्या-मेंढ्याचं खातं लटकावलं याच्यावरुनच त्यांचं पक्षातलं वजन कळतं, अशी बोचरी टीकाही दानवेंनी केली. आमच्या या भांडणाचा युतीवर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वासही दानवेंना आहे.

मी सर्व आरोप पुराव्यानिशी करत आहे, माझ्यावर करत असलेल्या आरोपांचे त्यांनी पुरावे दाखवावेत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, की त्यांनी पुढची निवडणूक शिवसेनेतून लढावी, असंही दानवे म्हणाले.
खोतकरांच्या तक्रारीमुळे दानवेंना 'मातोश्री'वर नेणं टाळलं?

साखर कारखाना आणि मार्केट कमिटीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांना लुटल्याचा आरोपही रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांवर केला.

रावसाहेब दानवे यांना सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाशी खास बातचित करताना केला.

“जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दानवेंचा प्रचंड दबाव असून, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार प्रचंड दहशतीखाली आहेत. दानवे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना 4-4 तास बाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवतात. दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे.” असा आरोप खोतकरांनी दानवेंवर केला.