2016 मध्येच शिवसेनेनं कुणाशीही युती करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
ज्याप्रमाणे अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले, तसंच इतरही राष्ट्रीय पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांनाही आम्ही वेळ देणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.
राजकीय वर्तुळात युतीची चर्चा
शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा देत असली तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. त्यात लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसभा निडवणुकीसाठी 2014 चा फॉर्म्युला कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भाजप 26 तर शिवसेना 22 जागा लढू शकते. मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन घोडं आडलेलं आहे.
तेलगू देसम पार्टी एनडीतून बाहेर पडल्यामुळे केंद्रातील नागरी उड्डाण आणि विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्रिपद रिक्त आहे. तिथं शिवसेनेची वर्णी लागू शकते, तर राज्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं दिली जाऊ शकतात.