मुंबई : मुंबईच्या अॅन्टी नार्कोटिक्स विभागानं सुंदर मॉडेल्सच्या मदतीनं ड्रग्ज आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तबस्सुम शेख आणि फुरकाना खातून अशी अटक केलेल्या महिलांची नावं आहेत.
या टोळीचे सदस्य भारतातून ड्रग्स घेऊन जायचे आणि ते विदेशात विकत असे. परदेशातून परतताना सोन्याची तस्करीही ते करायचे. मुंबईच्या अँटी नारकोटिक्स विभागानं केलेल्या कारवाईमुळे मॉडेलिंग क्षेत्राचं भयाण वास्तव समोर आलं आहे.
सुंदर आणि अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या महिलांनाच या टोळीत सहभागी करुन घेतलं जायचं. वेगवेगळ्या राज्यात असलेले एजेंट यासाठी काम करायचे. सहभागी करुन घेतलेल्या महिलांना ट्रेनिंग ही दिलं जात असे.
भारतात मिळणाऱ्या ड्रग्सची किंमत विदेशात दहा पटीनं वाढते. त्यामुळे ही टोळी भारतातील ड्रग्स परदेशात विकत असे. यासाठी तस्करी करणाऱ्या मॉडेल्सना मोठी रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पासपोर्ट तयार करणारे एजंट या टोळीत काम करण्यासाठी महिलांना शोधत असत, ज्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय टोळीत सक्रिय असणाऱ्या 25-30 महिलांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या कारवाईत या महिलांकडून 25 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ज्याची परदेशी बाजारातील किंमत जवळपास दोन कोटींच्या घरात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील महिला तस्करीसाठी बांगड्या, मेक अप बॉक्स यांसारख्या वस्तूंचा आधार घेत असत, जेणेकरून सुरक्षारक्षकांची नजर त्याकडे जाणार नाही. विमानतळावर महिलांची तपासणी जास्त प्रमाणात केली जात नाही, याचाच फायदा या महिला घेत.