मुंबई : 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केल्याबद्दल माफ करा, असं म्हणत एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिम समुदायासमोर हात जोडले. गणेशोत्सवादरम्यान 'बाप्पा मोरया'ची घोषणा दिल्याबद्दल वारिस पठाण माफी मागत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.


काही दिवसांपूर्वी वारिस पठाण एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला होता. 'गणपती बाप्पाने तुमची सर्व विघ्नं दूर करावीत, तुमच्या मार्गातले अडथळे दूर करावेत. सगळ्यांना आनंद द्यावा. गणपती बाप्पा मोरया' असं वारिस पठाण म्हणत असल्याचं संबंधित व्हिडिओत दिसत आहे.

आता समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये वारिस पठाण जाहीरपणे मुस्लिम समाजाची माफी मागताना दिसत आहेत. 'काही दिवसांपूर्वी माझ्या तोंडून शब्द निघून गेले. माझ्याकडून चूक झाली. अशी चूक पुन्हा होणार नाही. मी एक माणूस आहे. प्रत्येक माणसाकडून चूक होते. अल्लाने माझा गुन्हा माफ करावा, यासाठी प्रार्थना करा.' असं वारिस पठाण म्हणत आहेत.

वारिस पठाण यांनी 'बाप्पा'चा जयघोष केलेल्या व्हिडिओची तसंच माफी मागितल्याच्या व्हिडिओची सत्यता 'एबीपी माझा'ने तपासलेली नाही.

गणपती बाप्पा हे हिंदू धर्मीयांचं आराध्य दैवत आहे. मात्र गणेशोत्सव साजरा करताना सर्वधर्मीयांना सामावून घेतलं जातं. त्यामुळे हा जयघोष केल्याबद्दल वारिस पठाण यांनी माफी का मागितली, असा सवाल विचारला जात आहे.