मुंबई : मध्य रेल्वेकडे आता तिसरा डोळा सुरक्षेचे काम करणार आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफने दोन निंजा ड्रोन आपल्याकडे समाविष्ट केले असून त्याद्वारे आता रेल्वेच्या संपत्तीची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षेचे काम केले जाणार आहे.
ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे आणि खर्च बचतीच्या दृष्टीने प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. यामुळे मनुष्यबळाचा वापरही मर्यादित होतो. त्यामुळेच मध्य रेल्वेच्या आरपीएफने चार जवान प्रशिक्षण देऊन दोन टीम तयार केल्या आहेत. या जवानांकडे दोन निंजा ड्रोन दिले गेले असून, त्याद्वारे, वेगवेगळ्या स्टेशन परिसरात आकाशातून पाळत ठेवली जाईल. या ड्रोनच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वे ट्रॅक, यार्ड, कार्यशाळा या रेल्वे क्षेत्रात नजर ठेवली जाईल. त्यांच्या मदतीने रेल्वे हद्दीत घडणारे गुन्हे रोखता येतील. तसेच रेल्वे हद्दीत झालेले अतिक्रमण देखील रोखता येईल. या ड्रोन्स उड्डाणासाठी परवाना मध्य रेल्वेने मिळवला आहे.
मध्य रेल्वेकडे असलेल्या या निन्जा ड्रोन्सची रेंज 2 किमी आहे आणि 25 मिनिटांपर्यंत ते हवेत उड्डाण करू शकतात. त्याचे टेक ऑफ वजन 2 किलोपर्यंत आहे. हे ड्रोन्स दिवसा 1280x720 पिक्सेल क्वालिटीवर एचडी व्हिडिओ कॅप्चर करू शकतात. यात रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि स्वयंचलित मोड देखील आहे.
ड्रोन्स का आहेत महत्त्वाचे?
- रेल्वे मालमत्तेची तपासणी आणि यार्ड्स, वर्कशॉप्स, कार शेड्स इत्यादींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांची मदत होईल.
- रेल्वे परिसरातील गुन्हेगारी आणि असामाजिक बाबींवर पाळत ठेवणेसाठी, त्यामध्ये जुगार खेळणे, कचरा टाकणे, अवैध फेरीवाले अश्या गुन्हेगारीला आळा घालता येईल.
- गाड्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी असुरक्षित किंवा धोकादायक विभागांचे विश्लेषण करून माहिती गोळा करता येईल.
- एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास किंवा पाणी भरले असल्यास इतर एजन्सींसोबत समन्वय साधणेसाठी उपयुक्त ठरतील
- रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि रेल्वे मालमत्तेचे मॅपिंग करण्यासाठी फायदा होईल.
- गंभीर परिस्थितींमध्ये, सणासुदीच्या काळात गर्दीचे निरीक्षण/व्यवस्थापन करणेसाठी कामाला येतील.
या ड्रोन्सच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडीओ मिळत असल्याने जर एखादा गुन्हा घडत असेल तर त्याक्षणी त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी विभागातील जवळच्या आरपीएफ पोस्टवर माहिती दिली जाते. अशा प्रकारे दोन गुन्हेगारांना रिअल टाइम व्हिडिओच्या आधारावर वाडीबंदर यार्ड परिसरात आणि कळंबोली मैदानात पकडण्यात आले आहे. ते यार्डमध्ये रेल्वेच्या डब्यात चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे या ड्रोन्सची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.