मुंबई : मुंबईतल्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात शासनाच्या एका विभागाकडून सध्या खुदाई काम करण्यात येत आहे. गणेशोत्सवामध्ये घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी हा तलाव तयार करण्यात येत असल्याचं इथल्या कामगारांनी सांगितल्यानंतर स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पडलेलं आहे. कोणत्याही परवानगीविना ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात हे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


ऑगस्ट क्रांती मैदान... 1942 साली स्वतंत्र भारताच्या आंदोलनाचा नारा याच मैदानातून देण्यात आला होता. अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आझाद मैदानात सध्या सर्वत्र खुदाईचं काम आणि चिखल पाहायला मिळतोय. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदानकडे पाहिले जाते. त्यामुळे या मैदानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर राज्य शासन, मुंबई महानगरपालिका यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशन पर्यंत अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्याशिवाय ऑगस्ट क्रांती मैदानात कोणताही कार्यक्रम अथवा कोणतीही कृती आपल्याला करता येत नाही. असे असताना शासनाच्या एका विभागाकडून सध्या या मैदानाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खुदाई करण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. तर याच शेजारी असणाऱ्या दुसऱ्या मैदानात मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मलबार हिल परिसरात कोसळलेल्या दरडी तील दगड, माती या मैदानात आणून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे हे ऑगस्ट क्रांती मैदान आहे की बीएमसीचं डम्पिंग ग्राउंड आहे हे कळायला मार्ग नाही. सध्या या मैदानात तलाव बांधण्याचे काम चालू आहे. येत्या गणेशोत्सवातील गणेशमुर्तींचे विसर्जन या तलावात करण्याचे नियोजन शासनाचे आहे. मात्र हा तलाव बांधत असताना या मैदानात खुदाई करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. एवढेच काय या खुदाईच काम स्थानिक पोलीस आणि स्थानिक नगरसेवकांना देखील माहिती नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


गणेशोत्सवामध्ये घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन तलावात करण्यासंदर्भातचे नियोजन शासनाने केले आहे. या गोष्टीच स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र हा तलाव या ऐतिहासिक मैदानात तयार करताना या तलावाची मात्र मोठ्या प्रमाणात दुरावस्था करण्यात आलेली आहे. खुदाईसाठी अन्य ठिकाणे, अनेक जागा असताना या ऐतिहासिक मैदानाचा वापर का करण्यात आला आहे आणि यासाठी कोणत्याही विभागाची परवानगी का घेण्यात आलेली नाही , असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेले आहेत. आज काही स्थानिक नागरिकांनी या मैदानात जमून हे काम बंद पडले आहे. तसेच या संदर्भात स्थानिक पोलिस ठाण्यात आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार देखील केलेली आहे.


प्रतिक्रिया


सुनील परब ( स्थानिक रहिवाशी)


ऑगस्ट क्रांती मैदान हे मुंबईच्या मध्यभागी आहे आणि याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे . आम्ही लहानपणापासून या मैदानातील विविध कार्यक्रम पहात आलेलो आहे. या परिसरात कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर अनेक विभागांची परवानगी घ्यावीच लागते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून काही अधिकारी कामगारांसोबत या मैदानात येऊन त्यांनी खुदाई चे काम चालू केले आहे. त्यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही स्थानिक नगरसेवकांना याची कल्पना देऊन आता हे काम थांबलेले आहे. काम कोणतेही असो पण ते संपूर्ण विभागांच्या परवानग्या घेऊनच करावं अशी आमची इच्छा आहे.


आदेश पाटील (स्थानिक नागरिक )


ऑगस्ट क्रांती मैदान हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. या मैदानाला प्रशासनाने डंपिंग ग्राउंड केले आहे. सुरुवातीला इथं रात्री मद्यपींचा अड्डा बनला होता. सध्या प्रशासनानं मुंबईतील अनेक ठिकाणची माती या ठिकाणी आणून टाकलेली आहे. तर गणेश विसर्जनाच्या नावाखाली या ठिकाणी सध्या तलाव बांधला जात आहे. सामान्य नागरिकांनी या मैदानात एखादा कार्यक्रम घ्यायचा ठरवला तर त्याला अनेक विभागांकडे परवानगी घेण्यासाठी पाठवण्यात येतं आणि त्याला त्रास दिला जातो. सहजासहजी या मैदानात कार्यक्रम करण्यासाठी परवानग्या दिल्या जात नाहीत. परंतु गेल्या तीन दिवसांपासून काही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून या मैदानात खुदाई च काम करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. यासंदर्भात आम्ही प्रशासनाला विचारला असता त्यांना त्याची काहीच माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे विनापरवानगी ऑगस्ट क्रांती मैदानात काम करणाऱ्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.