Dr. Tatyarao Lahane: जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने(dr tatyarao lahane resignation) यांचा राजीनामा आता राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्या ठिकाणी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर लहाने यांनी आपला राजीनामा दिला होता. 


डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबत नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.. रागिणी पारेख यांचा देखील स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तसेच इतर सर्वच डॉक्टरांचा राजीनामा राज्यसरकारने मंजूर केला आहे. 


राजीनामा मंजूर झाल्यानंतर डॉ. तात्याराव लहाने यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "31 मे रोजी आपण राजीनामा दिला होता. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आमचं म्हणणं काय हेदेखील जाणून घेण्यात आलं नव्हतं. आमचं मत न घेता निवासी डॉक्टरांच्या आरोपांच्या आधारे एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला होता. निवासी डॉक्टरांनी जे काही आरोप केले आहेत ते खोटे आहेत. त्यामुळे आम्ही आठ डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. निवृत्त झाल्यानंतरही मला सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभार व्यक्त करतो."


राजीनामा दिल्यानंतर आपली कोणत्याही राजकीय नेत्याशी किंवा सरकारमधील व्यक्तीशी चर्चा झाली नव्हती असंही डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं.