Mumbai News : पदपथाच्या दिव्याच्या (Street Light Pole) उघड्या वीजवाहक तारेचा शॉक लागल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील वाकोला (Vakola) इथे घडली. याच दुर्घटनेत पाच वर्षांचा चिमुकला जखमी झाला आहे. त्याच्यावर व्हीएन देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


नेमकं काय घडलं?


वाकोल्यातील चैतन्यनगर इथे काल (2 जून) रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत तेहरीन इफ्तिकार या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर तनिष शिंदे या पाच वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. हे दोघेही काल रात्री दहा वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला खेळत होती. ज्या ठिकाणी ते खेळत होते तिथे एक पथदिवा आहे. त्याची वीज वाहिनी मोकळीच होती. खेळता खेळता या मुलांचा स्पर्श वीज वाहिनीला झाला आणि दोन्ही मुले खाली कोसळली. जखमी अवस्थेत त्या मुलांना स्थानिकांनी व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तेहरीन इफ्तिकारचा मृत्यू झाला.


'अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांवर आणि विकासकांवर कारवाई व्हावी'


या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. या घटनेची पूर्ण जबाबदारी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांची आणि बाजूला काम सुरु असलेल्या विकासकांची आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी संतप्त स्थानिकांनी केली आहे.


अहमदनगरमध्ये चार चिमुकल्यांच्या शॉक लागून दुर्दैवी मृत्यू


मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अहमदनगरमध्ये वीजवाहक तारेचा शॉक लागून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरात ही घटना घडली. 8 ऑक्टोबर वांदरकडा इथल्या छोट्याशा तळ्यात ही चार मुलं आंघोळीसाठी गेली होती. यावेळी त्यांना वीजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांचे नावं आहेत.


प्लॅटफॉर्मवर उभ्या टीसीवर पडली विजेची तार


सहा महिन्यांपूर्वी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसाच्या डोक्यावर अचानक हायव्होल्टेज विजेची तार पडली. यामुळे टीसीला जोरदार विजेचा झटका बसला आणि तो दूर फेकला गेला. पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यामधील खरगपूर रेल्वे स्थानकावरील ही धक्कादायक घटना घडली होती. अचानक विजेची तार पडून टीसीला विजेचा धक्का लागल्याने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.