Corona Warrior | भिवंडीत कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले डॉ. श्रीपाल जैन
डॉ. श्रीपाल जैन यांच्याकडे सध्या सकाळी 9 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये भिवंडी शहर व तालुक्या सह मुलुंड, ठाणे, मीरा भाईंदर, वालीव, वसई, पडघा, वाडा, शहापूर या परिसरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात.
भिंवडी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना नागरिकांसह नागरिकांवर उपचार करणारे डॉक्टर मंडळींनीही भीतीने आपली दाचाखाने बंद ठेवण्यात धन्यता मानली. मात्र भिवंडी शहरातील पद्मानगर येथे डॉ. श्रीपाल जैन हे शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. मागील कोरोना काळापासून आजपर्यंत त्यांनी आपले रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांची शुश्रूषा सुरू ठेवली असून विशेष म्हणजे रविवारी ही त्यांनी दवाखाना सुरू ठेवत रुग्णांना दिलासा दिला आहे.
कोरोना काळात अनेक डॉक्टर मंडळी रुग्णांकडून संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाना बंद करून घरात बसली. पद्मानगर येथील श्री भैरव क्लिनिक चालवणारे डॉक्टर श्रीपाल जैन यांनी रुग्णसेवा सुरू ठेवली. या काळात कोरोना रुग्ण रुग्णालयातील भीतीदायक वातावरणात मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने व सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयात बेड व ऑक्सिजन न मिळणे व्हेंटिलेटर उपलब्ध नसणे यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलेला असताना डॉ श्रीपाल जैन यांनी आपल्या क्लिनिकमध्ये कोविडं रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. पाहता पाहता पद्मानगर पाठोपाठ भिवंडी शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये दिवसाला सुमारे 70 ते 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी येऊ लागले. सकाळ संध्याकाळ क्लिनिकमध्ये येऊन उपचार घेऊन रुग्ण आपल्या घरी होम क्वॉरंटाईन राहण्यात धन्यता मानत कोरोनावर मात करू लागले. सध्या सकाळी 9 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये भिवंडी शहर व तालुक्या सह मुलुंड, ठाणे, मीरा भाईंदर, वालीव, वसई, पडघा, वाडा, शहापूर या परिसरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. येथे आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण बरे झाल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. त्यांच्यामुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले अशी कबुली वालीव वसई येथून उपचारासाठी स्वतः बरोबर आपल्या परिचितांना पाठवणाऱ्या रोहन मोहिते यांनी दिली आहे .
या क्लिनिकमध्ये सकाळ संध्याकाळ उपचार घेऊन बरे होणारे अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ज्यांच्या एक घरातील अनेकांना कोरोनाची बाधा होऊन ऑक्सिजन पातळी खालावलेली असताना डॉ. श्रीपाल जैन यांच्या वरील विश्वासामुळे आम्ही सर्व जण शासकीय रुग्णालयात उपचार न घेता यांच्या कडे उपचार करून बरे झाल्याचे समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया अंबाडी येथील नितेश जाधव यांनी दिली .
डॉ श्रीपाल जैन हे डॉक्टर सकाळी नाझरणा कंपाऊंड व त्यानंतर पद्मानगर क्लिनिकमध्ये सकाळ-संध्याकाळी प्रॅक्टिस करत असतात. तसेच आदर्श पार्क येथे भगवान महावीर रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांच्या तपासणीसाठीही वेळ काढून जात असतात. परंतु ही रुग्ण सेवा करत असताना डॉक्टर स्वतः तोंडावर मास्क अथवा हातात हॅन्डग्लोज न घालत रुग्णांवर उपचार करत असताना आलेल्या रुग्णास घाबरून न जाता उपचार घेऊन बरे होता येते हा विश्वास देत असल्याने व उपचाराने रुग्ण बरे होत असल्याने समाधान मिळत असल्याची कबुली डॉ. श्रीपाल जैन यांनी दिली आहे .