मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आज प्रत्येकजण घरात बसून आहे. या आजाराने इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालंय की जवळचे नातेवाईकही दुरावले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही डॉ. सोनवणे दाम्पत्य रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर मोफत उपचार करत आहेत. डॉ. अभिजीत आणि मनिषा सोनावणे हे कार्य 2015 सालांपासून अव्याहतपणे करत आहेत. लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून भिकाऱ्यांसाठी काम करत "डॉक्टर फॉर बेगर्स" अशी ओळख अभिनानानं मिरवणाऱ्या डॉ. अभिजीत आणि मनिषा सोनावणेंचा संघर्ष! आज माझा कट्टा या कार्यक्रमात उलगडला.



डॉ. सोनवणे दाम्पत्य केवळ भिक्षेकऱ्यांवर उपचार करत नाही. तर, त्यांच्यात स्वाभिमान जागवून त्यांना आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील रस्त्यावरच्या मंदिर आणि मशिदीबाहेरच्या दिव्यांग आणि भिक्षेकऱ्यांना रस्त्यावरच डॉक्‍टर तपासतात आणि लगोलग मोफत वैद्यकीय सुविधांही देतात. भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देऊन, त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याचंही काम ते करतात. सामाजिक बांधिलकीतून डॉ. सोनवणे दाम्पत्य हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.



डॉ. सोनवणे मूळचे म्हसवडचे (ता. माण, जि. सातारा). त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मनीषा दोघांनीही ‘बीएएमएस’चे शिक्षण घेतले. लग्नानंतर राहायला घर नव्हते. रुग्णालय सुरू करायलाही पैसे नव्हते. डॉ. अभिजित मित्रांकडे, तर डॉ. मनीषा अनेक वर्षे मैत्रिणीकडे राहायची. आर्थिक चणचण पाचवीला पुजलेली. त्यामुळे डॉ. सोनवणेंच्या डोक्‍यात नको नको ते विचार यायचे. अशा नैराश्‍येत मंदिरात असताना तिथल्या एका भिक्षेकरी आजोबांशी त्यांचा संबंध आला. ते आजारी असल्याने डॉ. अभिजित यांनी त्यांच्यावर मोफत उपचार केले. मात्र, त्या बदल्यात आजोबांनी भरपूर पैसे दिले. याचं मला आश्चर्य वाटलं. चौकशी केल्यानंतर समजलं की ते एका श्रीमंत घरातील होते. मात्र, मुलाने त्यांना घरातून बाहरे काढले. त्या आजोबांनी ‘तुम्ही डॉक्‍टर आहात. डोक्‍यातून अभद्र विचार काढून टाका. आपत्ती जातील,’ अशा शब्दांत नैतिक आधार दिला. डॉक्‍टर दाम्पत्याचे मतपरिवर्तन झाले.



सुरुवातीला डॉ. सोनवणेंनी दोन पिशव्या भरून औषधे घेतली. ते घरोघरी जाऊन कोणी रुग्ण आहे का, विचारून गोळ्या द्यायचे आणि पैसे घ्यायचे. पैशाबरोबरच कित्येकदा अपमानही व्हायचा. याच रस्त्यावरून फिरताना वाटेत भिक्षेकरी भेटायचे. ते डॉक्‍टरांना आजार सांगायचे. डॉक्‍टर गोळ्या द्यायचे. भिक्षेकरीच आठ आणे, रुपया गोळा करून डॉक्‍टरांना खर्चायला द्यायचे, त्यांच्यातलं चांगलं अन्न उरवून त्यांना खाऊ घालायचे. त्या वेळी ते डॉक्‍टरांना म्हणायचे, ‘बाबा, आमचं हे कर्ज हाय तुज्यावर आसं समज. तू जवा कवा मोटा व्हुशील, तवा तुला जसं जमंल, जेवा जमल ते फेड, मंग तर झालं?’


काही वर्षांनंतर सोनवणेंना चांगली नोकरी मिळाली. आतापर्यंत जे मिळाले नाही, ते मिळवण्याच्या जिद्दीने पैसा कमावण्यात गुंतले, पण एक दिवस त्यांचेच मन त्यांना खाऊ लागले. आपण कर्ज कुठं फेडलंय त्यांचं? असा प्रश्‍न भेडसावू लागला. अखेर भिक्षेकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय 15 ऑगस्ट 2015 ला त्यांनी घेतला आणि नोकरीचा राजीनामा दिला. डॉक्‍टरांनी संकल्प केला की, भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन करायचे. मंदिराबाहेर एकही भिक्षेकरी नसावा, प्रत्येक भिक्षेकऱ्याला घर किंवा आश्रम मिळावे, असे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. तेव्हापासून आजपर्यंत सोनवणे दाम्पत्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.