मुंबई : राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात डोंबिवलीच्या शशांक चंद्रहास प्रभू हे 159 गुण मिळवून (99.99 पर्सेन्टाइल) प्रथम आले आहे. तर मुंबईचा अंकित उदित ठक्कर आणि लखनौची आकांक्षा श्रीवास्तव अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा क्रमांकामध्ये 5 उमेदवार मुंबईचे असून इतर उमेदवार अमरावती, औरंगाबाद, नाशिकचेही आहेत. विशेष म्हणजे पहिल्या 16 विद्यार्थ्यांना 99.99 पर्सेन्टाइल आहेत.


यामध्ये या सीईटी परीक्षेत राज्यात पहिले आलेले शशांक प्रभू हे मागील 10 वर्षांपासून एमबीए सीईटी परीक्षा देत आहेत. अगदी सुरवातीला 2010 मध्ये त्यांनी मनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सीईटी दिली. त्यावेळीही 200 पैकी 179 गुण मिळवून राज्यात पहिले आले होते. मात्र, तरीही अधिक चांगली संस्था मिळावी म्हणून राष्ट्रीय प्रवेश परीक्षा दिली. त्यावेळीही पहिल्या दहामध्ये त्यांना स्थान मिळाले आणि राष्ट्रीय प्रवेश परीक्षेतील उत्तम गुणांमुळे दिल्ली विद्यापीठाच्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. तेथून 2013 मध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विविध प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन सुरू केले.




तेव्हापासून विद्यार्थी म्हणून नाही पण मार्गदर्शक म्हणून ते परीक्षा देतात आणि पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवतात. त्यामुळे परीक्षेतील बदल काय होतायत याचा अभ्यास करण्यासाठी या परीक्षा मी देत असून माझ्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे परीक्षेत नुकसान होणार नाही याची मी काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितलं. शिवाय, मी परीक्षा दिल्यामुळे कठीण प्रश्न, नेमकी काय आव्हान या परीक्षा देताना येतात हे मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महत्वाचे ठरते, असं शशांक प्रभू म्हणाले.


यंदा राज्यातील 36 हजार 765 जागांसाठी ही सीईटी प्रवेश परीक्षा १4 व 15मार्च रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला राज्यभरातून 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थी बसले होते.


औरंगाबाद विभागीय मंडळाचा अजब आदेश; राज्यातील दहावी, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI