मुंबई : राज ठाकरेंच्या समर्थनार्थ 22 ऑगस्टला मनसेकडून शक्तिप्रदर्शन होणार आहे. राज ठाकरेंसोबत हजारो मनसैनिक ईडी कार्यालयापर्यंत जातील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मात्र ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नका, असं आवाहन स्वत: राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यंना केलं आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्यावर आणि माझ्यावर अनेक केसेस दाखल झाल्या आहेत. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे. त्यामुळे आपण ईडीच्या या नोटीसचाही आपण आदर करु. माझ्यावर असलेल्या तुमच्या प्रेमाची मला जाणीव आहे, तरीही ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.





एवढ्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटीस यांची सवय झाली आहे. म्हणूनच 22 ऑगस्टला शांतता राखा, अशी विनंती राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केली आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न होत आहे, पण तुम्ही शांत राहा, असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. तसेच सरकारने केलेल्या कारवाईवर  योग्य वेळ येईल तेव्हा बोलेनच, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.


काय आहे प्रकरण?


काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.


VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष



संबंधित बातम्या