मुंबई : कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीवरुन खासदार संभाजीराजे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे निशाणा साधला आहे. विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावर उतरुन पूरग्रस्तांसाठी मदत मागितली होती. यावर संभाजीराजे चांगलेच संतापले आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी विनोद तावडे यांना सुनावलं आहे. त्यांनी फेसबुकवर आपला रोष व्यक्त केला आहे.


संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणतात, "स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे."



कोल्हापूर आणि सांगलीतील पुरात सर्वस्व गमावलेल्या नागरिकांसाठी राज्यातून मदतीचा ओघ सुरु झाला. पूग्रस्तांसाठी अनेकांनी आपापल्या परीने मदत दिली. 11 ऑगस्ट रोजी मुंबईतील बोरिवलीमध्ये भाजपने मदत फेरीचं आयोजन केलं होतं. यावेळी विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी रस्त्यावर उतरुन, गल्लोगल्ली जाऊन पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचं आवाहन केलं. यावेळी जमा झालेला निधी आणि साहित्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवणार असल्याचं तावडे आणि शेट्टी यांनी सांगितलं होतं.

परंतु तावडे यांची मदत मागण्याची ही पद्धत खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आवडली नाही. त्यांनी फेसबुकवर तावडेंचा व्हिडीओ पोस्ट करुन त्यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान यावर विनोद तावडे यांनी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही.