मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधीच मतभेद असल्याचं समोर येत आहे. नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरुन काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता यात्रेचं आयोजन केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे.
नाना पटोले काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून सध्या काम पाहत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत अजून ठोस कार्यक्रम नसल्याने नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसमधील नेतेच नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पक्षात कोणतेही मतभेद नाहीत- नाना पटोले
पोलखोल यात्रेवरून पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. तारखांची थोडी जुळवाजुळव सुरु होती, त्यामुळे यात्रेची तारीख पुढे ढकलण्यात आली. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत या यात्रेबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे याबाबत नाराजीचा प्रश्नच नाही, अस नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
पोलखोल यात्रा आता 20 ऑगस्ट ऐवजी 25 ऑगस्टला सुरु होणार आहे. ही यात्रा एकाच वेळी दोन ठिकाणांहून सुरु होत असल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. उत्तर महाराष्ट्रातून विधानसभेचे विरोधी पक्षनेत विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात यात्रा निघणार आहे. तर विदर्भातून नाना पटोले या यात्रेचं नेतृत्व करणार आहेत.
अशी असणार पोलखोल यात्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिथे जिथे गेले, त्याठिकाणी काँग्रेसची पोलखोल यात्रा जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलखोल या यात्रेत केली जाणार आहे. मोजरीपासून मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनादेश यात्रेची सुरुवात केली होती. नाना पटोले देखील पोलखोलची सुरुवात तिथूनच करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विकासाचे जे दावे केले ते किती खरे किती खोटे आहेत, यासाठी ही पोलखोल यात्रा असणार आहे.