कोरोनाचा (Coronavirus) धोका आधीही टळला नव्हता आणि अजूनही टळलेला नाही, हे वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. मात्र तरीही अनेक नागरिक कोरोनाचा नायनाट झाल्याच्या अविर्भावात सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून समाजात वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.  या अशा पद्धतीने फिरणाऱ्यांचा हा आकडा कमी असला तरी यांच्यामुळे समाजाला मोठ्या प्रमाणात धोके संभवतात. प्रशासन आणि  खासगी, शासकीय, महापालिका  आरोग्य यंत्रणेच्या या अथक परिश्रमानंतर कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यात यश संपादन झाले असले तरी कोरोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही, त्यामुळे सर्व स्तरावर आजही सातत्याने प्रयत्न सुरु आहेच. त्यामुळे कोरोनाचा विसर पडणे हाच सध्याच्या घडीला मोठा धोका असल्याचे मत, या क्षेत्रात काम करण्याऱ्या आणि या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


दिवाळीनंतर ज्या पद्धतीने बाहेरच्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली त्यापद्धतीने आपल्या देशात आणि राज्यातही परिस्थिती गंभीर वळण घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आपल्याकडे अजून पाहिलीच लाट ओसरली नसल्याने दुसऱ्या लाट येणायचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्याचा आरोग्य विभाग दैनंदिन अहवाल सादर करत असतो त्यामध्ये राज्यातील एकंदरच कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी असल्याचे दिसले आहे. मृतांच्या आकड्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही आकडेवारी पाहता काही  नागरिकांनी तर मास्क घालण्याचे सोडून दिल्याचे महापालिकेच्या कारवाईतून दिसून आले. रस्त्यांवरची वर्दळ वाढली आहे. या सगळ्या प्रकारात कोरोनाची साथ आजही राज्यात आहे याचा त्यांना विसर पडला आहे हीच धक्कादायक बाब स्पष्ट होतेय.


मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे परळ येथील के. इ. एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख सांगतात की, "जर आपल्यावर पूर्वीसारखी परिस्थिती ओढवायची नसेल, तर नागरिकांनी सजग राहणे फार गरजेचे आहे. कोरोनाच्या नव्या प्रजातीचा हाहाकार पाश्चिमात्य देशांत झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे. सध्या कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रांत आहे म्हणजे सगळे आलबेल झालं आहे आणि आता चिंता करायची गरज नाही असा खोटा समज बाळगणे खूप धोकादायक आहे. प्रत्येकाने सुरक्षिततेचे नियम आणखी काटेकोरपणाने पाळले पाहिजेत. कारण जो नवीन विषाणू आहे त्याचे संक्रमण खूप वेगाने होते आणि त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. "


Corona मुळं नोकरी गेली, पण एका फोन कॉलनं नशीब उघडलं


आपल्याकडे नवीन वर्षाचे स्वागत  म्हणजे एक मोठा उत्सव साजरा केल्यासारखा साजरा केला जातो. त्यात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर, उपहारगृहात  या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र या वर्षी कोरोना या संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळून साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे यावेळी विविध स्तरातून आवाहन करण्यात आले आहे.


"नागरिक कोरोना विसरले आहेत. कारण, ते आता खूप कंटाळले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अनेकांच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.  नातेवाईकांना भेटता येत नाही. नागरिकांच्या मानसिकतेवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होण्यास सुरवात झाली आहे. एकंदरच या सगळ्या वातावरणात मोकळीक मिळाल्यास ते क्षण त्यांना आनंदात घालवायचे असतात. हे सगळे वास्तव खरे असले तरी या आजाराचे गंभीर स्वरूप बघता सगळ्यांनी सुरक्षितता आणि त्या दृष्टीने आखलेले नियम पाळलेच पाहिजे. कारण आरोग्यापुढे सगळ्या गोष्टी निरर्थकच. त्यामुळे नागरिकांनी याचा कोरोनाची साथ अजूनही हे लक्षात ठेवून वागले पाहिजे." असे लीलावती रुग्णालयातील वरिष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं.


वरिष्ठ आणि मुख्य म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेला हा उशारा पाहता, कोरोनाचा प्रभाव काही अंशी कमी दिसत असला तरीही हे संकट काही टळलेलं नाही हेच स्पष्ट होत आहे.