मुंबई : मुंबईतील परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात 'टोटल लॅप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी' शस्त्रक्रियेद्वारे 32 वर्षीय व्यक्तीने यकृतदान करुन आपल्या एक वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यकृतदान करणारा व्यक्ती हा मूळचा दक्षिण आफ्रिकेतील आहे.


यकृतदानाच्या पारंपारिक पद्धतीत शरीराला चीर देऊन ही शस्त्रक्रिया केली जात होती. परंतु, टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रियेत नाभीच्या खाली लहानसे छिद्र देत ही शस्त्रक्रिया केली जाते. लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट (एलडीएलटी) शस्त्रक्रियेमुळे आता अवयवांच्या प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर कमी होत चालला आहे. अनेक रुग्णांना दात्याकडून मिळालेल्या यकृतामुळे नवीन आयुष्य मिळत आहे.


नयूम खान हा अवघ्या एक वर्षांचा मुलगा असून जन्मतः त्याला बिलीअरी अट्रेसिया हा यकृताचा एक दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी परेल येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय चाचणीनंतर यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार 32 वर्षीय वजीर खान यांनी आपल्या यकृताचा डाव्या बाजूचा भाग मुलाला दान केल्यानंतर या मुलावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकी 10 हजार नवजात बालकांपैकी एकाला हा आजार असतो. यात प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.


परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका म्हणाले की, "या मुलाला असणाऱ्या बिलीअरी अट्रेसिया या दुर्मिळ आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी आणले होते. वैद्यकीय चाचणीनंतर मुलाचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचं होते. त्यानुसार वडिलांनी यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्राचा वापर करुन हेपेटेक्टॉमी करण्याचा निर्णय घेतला. यात दुर्बिणीद्वारे यकृताचा भाग काढून घेतला जातो. टोटल लॅप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रिया हा एक सुरक्षित पर्याय आहे. यात कमी वेदना, रक्तस्त्राव कमी होणे आणि गुतांगुत होण्याची शक्यता कमी होते. तरुण दात्यासाठी हा पर्याय अतिशय फायदेशीर आहे."



ग्लोबल रूग्णालयातील कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रशांथा राव म्हणाले की, "यकृतदानाची प्रक्रिया करताना (अंदाजे 15-20 सेमी) इतका छेद करावा लागतो. या शस्त्रक्रियेमुळे दात्याला 2 ते 3वर्ष वेदना जाणवू शकतात. परंतु, टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रियेमुळे दात्याला कोणतीही वेदना होत नाही, शरीरावर चट्टे दिसत नाहीत आणि गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यताही खूप कमी असते."



लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले की, "सर्व मार्गदर्शक सूचना आणि प्रोटोकॉलचे पालन करुन या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुलाची प्रकृती सुधारल्यानंतर लवकरच हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेला परत जाणार आहेत."


"आमच्या रुग्णालयातील यकृत शस्त्रक्रियेसाठी असणाऱ्या डॉक्टरांची टीम रुग्णांना अत्यंत दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. लॅप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रिया ही मोजक्याच केंद्रांमध्ये केली जात आहे. आमच्या रुग्णालयात ही अशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने आम्ही आनंदी आहोत. ही शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक पद्धतीद्वारे करण्यात आली असून दात्याकडून यकृताचा काही भाग घेण्यात आला आहे. ही प्रकिया अतिशय सुलभ असल्याने यकृताच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना यकृतदान करण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन देईल," असे ग्लोबल रुग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर यांनी सांगितलं.


रुग्ण वजीर खान म्हणाले की, "ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने केलेल्या उपचाराबद्दल मी आभारी आहे. बाळ आता रडत नसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, हे पाहून आनंद होत आहे. पूर्वी बाळ नेहमी आईजवळच राहत होते. परंतु आता ते पहिल्यांदा माझ्या कुशीत झोपले. ही भावना माझ्यासाठी खूप खास आहे. यकृतदानाच्या शस्त्रक्रियेमुळे मला फार वेदना झाली नाही. आम्ही उपचारांसाठी भारतात येणाऱ्या घेतलेला निर्णय योग्य ठरला आहे."