Mumbai Night Club Raid मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे. तर, रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघड होत आहे.


प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत क्लब सुरु ठेवल्यामुळं कारवाई करण्यात आली आहे. या क्लबच्या ग्राहकांमध्ये अनेक सेलिब्रिटी असल्याची माहिती समोर आली असून, यामध्ये एकूण 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये 27 ग्राहकांसह 7 कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मुंबई एअरपोर्टजवळ असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लब येथे मुंबई पोलिसांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकली. ज्यानंतर क्लबमध्ये असणाऱ्यांची नावं समोर आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 34 जणांमध्ये सुरेश रैनाचा समावेश असल्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल झाल्याचं म्हटलं जात आहे.





कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हॉटेल सुरु करण्याला सशर्त परवानगी दिली खरी. पण, नियमांची पायमल्ली करत काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवले जात आहेत, तिथं कोरोनासाठीच्या निर्बंधांचं योग्य पालनही केलं जात नसल्यामुळं ही धाड टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.



नियमांची पायमल्ली सुरुच


मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ड्रॅगन क्लबमध्ये 19 जण दिल्ली आणि पंजाबमधून आल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात असताना इथं मुंबईतील क्लब आणि पब कडून मात्र नियमाचं पालन केलं जात नाहीये. त्यामुळं अनेक प्रश्न उभे राहत आहेत. दरम्यान, प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार सेलिब्रिटींना पोलिसांनी समज देऊन सोडल्याचं कळत आहे.


दरम्यान, सदर घटनेबाबत प्रतिक्रिया देत माध्यमांशी संवाद साधताना सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू असतानाही रात्री उशिरापर्यंत क्लब सुरु असल्यामुळं ही कारवाई करण्यात आल्याचं ते म्हणाले. भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 188 आणि 33 W या कलमांअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.