नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनंतरचं आयुष्य किंवा दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील. किंबहुना या बदलांची काही अंशी सुरुवातही झाली आहे. हा बदल काहींसाठी सकारात्मक आहे, तर काहींसाठी नकारात्मक. जगभरात थैमान घालणाऱ्या या विषाणूनं सर्वच बाबतींत अडचणींचा डोंगर उभा केला. यामध्ये नोकऱ्या गमावलेल्यांची संख्या तुलनेनं जास्त. पण, त्यातूनही नोकरी गमावलेल्या एका तरुणाच्या नशीबाला अनपेक्षित कलाटणी मिळाल्याची घटना घडली आहे. ज्यामुळं सध्या याचीच चर्चाही सुरु आहे.


नवनीत संजीवन असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव. तो मूळचा केरळचा आहे. तो अबूधाबीतील एका कंपनीत नोकरी करत होता. पण कोरोना काळात त्याला नोकरी गमवावी लागली. कंपनीवर आलेल्या आर्थिक संकटामुळं त्यालाही नोकरी सोडण्यास सांगण्यात आलं. सध्या नवनीत या कंपनीत नोटीस पीरिएडवर आहे.


सोबतच तो इतर ठिकाणी नोकरीच्या शोधातही आहे. काही ठिकाणी त्यानं मुलाखतीही दिल्या आहेत. नोकरीच्या फोनकॉलच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नवनीतला एके दिवशी असाच एक फोनकॉल आला आणि त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. नवनीतला आलेला हा फोन होता दुबई ड्यूटी फ्रीचा. DDF Millennium Millionaire Draw प्रकारातील लॉटरीमध्ये त्याला तब्बल 1 मिलियन डॉ़लरची लॉटरी लागली आहे, असं या फोनकॉलमध्ये सांगण्यात आलं.


1 जानेवारीपासून बदलणार बँक, वीमा योजनेतील महत्त्वाचे नियम, पाहा पूर्ण यादी


मूळचा केरळमधील कासारगोडचा असलेला नवनीत विवाहित असून तो पत्नी आणि लहानग्या मुलासह दुबईतच राहतो. त्यानं हे लॉटरीचं तिकीट 22 नोव्हेंबरला विकत घेतलं होतं. त्याची पत्नी अद्यापही दुबईमध्ये नोकरी करत असून, नवनीतही नोकरीच्या शोधात आहे. नोकरी न मिळाल्यास दुबईतून पुन्हा मायदेशी परतण्याच्या विचारात तो होता. आपल्यावर असणारं एक लाख दिरामचं कर्ज फेडण्यासाठीच तो प्रयत्न करत असल्याची माहिती त्यानं 'गल्फ न्यूज'शी संवाद साधताना दिली.


डीडीएफ लॉटरी जिंकणारा नवनीत हा 171 वा भारतीय आहे. या लॉटरीच्या सोडतीमध्ये आजवर अनेक भारतीयांना बक्षिस घोषित झालं आहे. सहसा लॉ़टरी आणि तत्सम प्रकार हे नशीबाचाच भाग समजले जातात. कित्येकांचा यावर विश्वासही बसत नाही. पण, नवनीतसारखी उदाहरणं पाहता खरंच नशीबही कलाटणी घेतं आणि तेसुद्धा अगदी अनपेक्षितपणे हेच सिद्ध होत आहे.