मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दरी वाढली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.. शरद पवार यांची तब्येत खराब असून बुधवारी शस्त्रक्रिया होणार आहे, असं पक्षाने स्पष्ट केल्यानंतर देशातील विविध नेत्यांनी विषेशतः केंद्र सरकारमधील पंतप्रधानापासून अनेक मंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली. शरद पवार यांनी देखील ट्विटरवरून त्यांचे आभार मानले. पण विचारपूस करणाऱ्याच्या ट्वीटमध्ये दिल्लीतील राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांचा उल्लेख नाही. त्यामुळे एकीकडे भाजपच्या नेत्यांची शरद पवारांशी जवळीक वाढू लागलीय, तर काँग्रेसचे नेते पवारांपासून अंतर ठेवून आहेत, असं दिसून येत आहे.
थोड्याच दिवसपूर्वी शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत टीका देखील केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संबंधांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील याबाबत संजय राऊत संपादक आणि खासदार यात गफलत करत आहेत का? असा प्रश्न विचारला आणि याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल असे सूतोवाच केले.
शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे, लतादिदींकडून विचारपूस
एकीकडे हे सर्व सुरु असताना शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याचे वृत्त आले आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादीने वारंवार अशी भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले तरी दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठी याकडे कसे पाहतात त्यांची भूमिका अजून समोर आलेली नाही. शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांनी फोन केले. मात्र कोंग्रेसकडून राज्यातील नेते वगळता दिल्लीतील एकही नेत्यांकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे दिसत नाही.
गुप्त भेटीत काय झालं देशाला कळायला हवं; शरद पवार-अमित शाह भेटीवर काँग्रेसचा सवाल
भाजपकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर या दिल्लीतील नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या राज्यातील नेत्यांनी फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्वतः शरद पवार यांनीच ट्वीट करून त्यांचे आभार मानले आहेत.
मात्र काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, भालचंद्र मुणगेकर या राज्यातील नेत्याकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे. त्यांनी तसं ट्वीट देखील केले आहे. पण दिल्लीतील एकाही नेत्यांने विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी मात्र पवारांना याबाबत फोन केला नाही. ज्यांचे प्रकृतीच्या चौकशीसाठी फोन आले त्यांचे शरद पवारांनी ट्वीट करून आभार मानलेत. या ट्वीटवरूनच दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांचा पवारांना फोन आला नसल्याचं स्पष्ट होत आहे.
'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत', शरद पवारांसोबत बैठकीसंदर्भात अमित शाहांचं सूचक वक्तव्य
शरद पवारांच्या प्रकृतीविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, राज ठाकरे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूपासून देशातील अनेक नेत्यांनी ट्वीट करून शरद पवार यांना लवकर बरे व्हावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत. यूपीएचं अध्यक्षपद आणि अमित शहा-शरद पवार कथित भेट यामुळे काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीविषयी नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा आहे. आणि त्यातूनच पवारांची विचारपूस करणे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी टाळले का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.