मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळ सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. 


राज्यात कोरोनाची संख्या वाढते, याबाबत चिंता आहे.  सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जातो. परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय होतो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, जनतेचा बिनधास्तपणा कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं. 


राज्यात काल दिवसभरात 31 हजार 643 कोरोना रुग्णांनी नोंद


कोरोनाचा संसर्ग वाढला की रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे बेडची संख्या ही रुग्ण संख्यापेक्षा  कमी असते तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊन करावं लागतं. जर ICU आणि ऑक्सिजन बेडची संख्या याबाबत तक्रारी येऊ लागल्या तर लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल. याबाबत अभ्यास सुरू आहे.  काहीजण म्हणतात लॉकडाऊन नको, पण सगळा विचार करून मध्यबिंदू  गाठून निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.  


उद्धवजी अडचण अशी आहे की... ; आनंद महिंद्रांकडून लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला 


कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने होत आहे. त्यामुळे बेड्स काही शहरात उपलब्ध नाहीत हे मान्य आहे. या क्षणाला रुग्णालयात बेड मिळतच नाही असं नाही. कालच्या बैठकीत खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड ताब्यात घेतले पाहिजे, ज्यामुळे बेड कमी पडणार नाही. तसेच 80 टक्के ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर मेडिकल कारणांसाठी केला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.