नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीच्या वृत्तानंतर राज्याचं आणि देशातील राजकारणात अनेक हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे, तर काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जर देशाचे गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्यासोबत बैठक घेत असतील तर त्याची माहिती त्यांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे. याबद्दल जाणून घेणे नागरिकांचा हक्क आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील तर देशाला याची माहिती असायला हवी. दोन्ही नेत्यांमध्ये काय बातचित झाली हे देशाला कळायला हवं."
गुजरातमध्ये शरद पवारांच्या गुप्त भेटीमागचा नेमका अर्थ काय? भेट नेमकी कुणासोबत?
राष्ट्रवादीची भाजपवर टीका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुप्त बैठकीच्या बातमीबद्दल म्हटलं की, "गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही.
भेटीच्या बातमीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप बैठकीबद्दल अफवा पसरवत आहे. शरद पवार -अमित शाह या दोघांमध्ये कोणतीही बैठक झाली नाही. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल जयपूर थेट मुंबईत परतले होते.
'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत', शरद पवारांसोबत बैठकीसंदर्भात अमित शाहांचं सूचक वक्तव्य
अमित शाह यांना पत्रकार परिषदेत शरद पवारांसोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शाह यांनी 'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत' असं म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही.