नवी मुंबई : शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी दृष्टीपथात दिसत नसली तरी नामांतरावरून मात्र वाद निर्माण झाले आहेत. सिडकोच्या माध्यमातून तयार केले जात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सरकारने बाळासाहेब ठाकरे नाव दिले आहे. या नामांतराला भाजपने विरोध केला असून स्थानिक प्रकल्पग्रस्त दिवंगत नेत दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यासाठी 10 जूनला मानवी साखळी करून सरकारचा निषेध केला जाणार आहे.
नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती केली जात आहे. मुंबईतील विमानतळावर मर्यादा आल्या असल्याने नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे पॅसेंजर आणि कार्गो विमानतळ उभारले जात आहे. गेल्या 10 वर्षांपासून विमानतळाचे कामकाज रखडले असताना सद्या विमानतळाच्या नामांतरावरून वातावरण तापले आहे. सिडकोच्या संचालक मंडळात विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव पास करण्यात आला. सिडकोने पास केलेला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला सिडकोने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता भाजपकडून विरोध सुरू करण्यात आला आहे.
भाजप, आरपीआय आणि आगरीकोळी संघटनांनी दिवंगत प्रकल्पग्रस्त नेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे. यासाठी सद्या पोस्टर वॉर नवी मुंबईत रंगले आहे. हायवेवर, टोल नाक्यावर दोन्ही बाजूने पोस्टरबाजी सुरू झाली आहे. दि बा पाटील यांनी आंदोलन केल्यामुळेच 12.5 टक्के जमीनीचा मोबदला शेतकरी वर्गाला मिळाला असल्याने त्यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी 10 जूनला नवी मुंबई, पनवेल, उरण भागात मानवी साखळी करून सरकारला इशारा देण्यात येणार आहे.
शिवसेने दि बा पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना त्यांचा पराभव करण्याचे काम येथील काही नेत्यांनी केले आहे. आज तेच नेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह करीत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र आणि देशातील मानबिंदू आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भाजपचे दि बा पाटील यांच्यावरील प्रेम हे बेगडी असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना स्वतःसाठी भूखंड काढून घेण्यात त्यांनी रस दाखवला. मात्र, त्याचवेळी दि बा पाटील यांच्या नावाचा ठराव सिडकोत का पास केला नाही असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुणाचे नाव द्यायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेतील असे सांगत संजय राऊत यांनी या वादातून लांब राहणे पसंत केले आहे.