मुंबई : मुंबईसह उपनगरात आज मान्सूनचं दमदार आगमन झालंय. पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झालीय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यासमवेत आपत्ती नियंत्रण कक्षात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच मुंबईची पाहणी केली. 


मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदमाता परीसरात पोहचले. सकाळपासूनच मुंबईच्या बर्‍याच भागात पाऊस पडत आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच मुंबईची पाहणी केली. दादर टीटी आणि हिंदमाता येथे पाहणीसाठी न थांबता मुख्यमंत्री सरळ मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षात आले. डिझास्टर कंट्रोल रुममधून मुख्यमंत्र्यांनी पाचच मिनीटांत संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी न बोलता मुंबई महापालिका मुख्यालयातून ते बाहेर पडले.


ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. या पहिल्या पावसाने नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमाऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण झाला. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागांसह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी साचलं आहे.


हार्बल लाईन ठप्प
मुंबईमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी हार्बर लोकल ठप्प झाली आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरु राहिला तर जे मुंबईकर अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बाहेर पडले होतं आणि ते लोकलचा वापर करत होते त्यांना मात्र घराकडे परतताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत.