मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग आता सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयात पसरताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला हजर होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणि विशेषतः राष्ट्रवादीतील काही नेत्यांना संसर्गचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. तरीही कोणालाही लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले. धनंजय मुंडे हे कॅबिनेट आणि वर्धापन दिनाला उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सक्त आदेशाप्रमाणे आम्ही सर्व नियम पाळले होते. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर आपण काळजी घेणे गरजेचं असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.


सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण


इतरांना धोका नाही
धनंजय मुंडे यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करणार आहोत. ते फायटर आहेत ते परत कमबॅक करतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. दरम्यान, धनंजय मुंडेंची दोनदा तपासणी झाली होती. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तीन दिवसांनी पुन्हा रिपोर्ट केला तेव्हा पॉझिटिव्ह आला. त्यांना आता थोडासा श्वसनाचा त्रास होत आहे बाकी ते ठिक आहेत. ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापण दिनाच्या दिवशीही हजर होते. मात्र, आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे काळजी घेत आहोत. जोपर्यंत कोरोना संसर्गावर लस येत नाही. तोपर्यंत आपल्या सर्वांना काळजी घ्यायची गरज आहे. वर्धापनादिनाच्या दिवशी पाच मिनिटांचा कार्यक्रम झाला. यावेळी सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, कोणालाही लक्षणे आढळले तर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस होता. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोना, कॅबिनेटसह राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थिती