Devendra Fadnavis : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी संपली आहे. फडणवीस यांची जवळपास दोन तास चौकशी सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. पोलीस बदली अहवाल फुटला होता, त्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. याआधीदेखील फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. डीसीसी, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. थोड्याच वेळेत देवेंद्र फडवणीस माध्यमांशी संवाद साधणार आहेत.


मुंबई पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांना याआधीदेखील चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याला उत्तर दिले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी फडणवीस यांची आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी बारा वाजल्यापासून चौकशी सुरू केली.


मुंबई पोलिसांनी कोणते प्रश्न?


राज्य गुप्तचर विभागाची गोपनीय माहिती तुम्हाला कशी मिळाली? माहितीचा स्रोत काय? पेनड्राइव्हमधून आणखी काय माहिती मिळाली असे प्रश्न मुंबई पोलिसांनी विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


फडणवीसांच्या घरात भाजप नेत्यांची गर्दी


मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी चौकशी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सकाळपासून भाजप नेत्यांनी फडणवीस यांच्या घरी गर्दी केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आदींसह इतर नेते, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.


भाजपकडून राज्यभरात आंदोलन


देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप आक्रमक झाली होती. मुंबईसह राज्यभरात भाजपकडून सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक, बीड, नंदुरबार, अकोला, परभणी, हिंगोली, अमरावती बुलढाण्यासह यवतमाळमध्येही भाजपकडून सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली.


फडणवीसांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीकडून भाजपवर टीका


पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी करण्यात आली. फडणवीस यांच्या चौकशीविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन केले. यावरूनच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्र्यांनी भाजपवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या चौकशी करण्यात आली, तेव्हा भाजप इतकी आक्रमक का झाली नाही, असा प्रश्न सरकारमधील काही मंत्र्यांनी केला आहे. यावरच बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत, त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे?'' फडणवीस यांच्यावर निशाणा साधत छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''ईडी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर करता आणि इथं पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का?'' 


काही लोक स्वतःला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? : संजय राऊत 


देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीवरून सुरु असलेल्या गदारोळावरती शिवसेना नेते आणि खासदार यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?'' असा सवाल राऊत यांनी केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha