New initiatives for Mumbaikar’s : पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी नागरिकांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीकडे पांडे यांनी लक्ष वेधत, सोडवण्याचा प्रयत्न केला. नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. आयुक्तांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यास सांगून, नागरिकांच्या सूचनाही मागवल्या. त्यांनी नागरिकांना त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर देखील संपर्क साधण्यास सांगितले होते.


दरम्यान, एका ट्विटद्वारे त्यांनी सांगितले आहे की, या प्रयोगाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या मिळालेल्या प्रतिसादातूनच त्यांनी त्यांनी काही नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. ट्विटरद्वारे ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात मुंबईतील वाहतूक, ध्वनी प्रदूषण, बेकायदेशीर उपक्रम आणि संशायास्पद क्रियाकलाप या मुद्द्यांचा समावेश आहे.


पाहा ट्विट :



यात त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या प्रिय मुंबईकरांनो 12/03/2022 मला आपल्या मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती होऊन दोन आठवडे झाले आहेत. माझ्याशी संपर्क साधण्याविषयीच्या माझ्या खुल्या पत्राला आपला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. विनंती केल्याप्रमाणे आम्हाला आपल्याकडून सूचना मिळत आहेत. या सुचानांमध्ये आपल्याकडून ज्या विषयांवर सर्वात जास्त सूचना मिळाल्या आहेत ती क्षेत्रे आणि त्या सूचनांवर आम्ही आतापर्यंत केलेले कार्य खाली सूचीबद्ध केले आहे.’


यात त्यांनी वाहतुकी संदर्भातील दोन नवे उपक्रम सुरु केले आहेत. #WrongSideDriving आणि #RemoveKhatara हे नवे उपक्रम मुंबई पोलिसांनी हाती घेतले आहेत. दंड आकारण्यापासून ते नियमित कारवाई प्रकरणे निकाली काढण्यापर्यंतची धोरणे यात बदलण्यात आली आहेत. या अंतर्गत आतापर्यंत 425 दुचाकीस्वार ताब्यात घेण्यात आले असून, 856 खटारा काढण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.


ध्वनी प्रदूषण कामी करण्यावर भर!


तसेच, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येत होत्या. बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी व्यथा फेसबुक लाईव्हमध्ये काही नागरिकांनी मांडली होती. याची दखल घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई शहरातील काही नामांकित बांधकाम व्यावसायिकांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी मुंबईत रात्रीच्या बांधकामावर बंदीचा निर्णय जाहीर केला.


बेकायदेशीर उपक्रमांवर कारवाई


‘बेकायदेशीर जुगार अड्डे निदर्शनास आल्यानंतर तिथे आम्ही यशस्वीरित्या छापा टाकला. ऑनलाइन बेकायदेशीर लॉटरीची तक्रार आली होती, आम्ही त्यावर कारवाई केली. डान्स बारचीही तक्रार करण्यात आली आणि केवळ या व्यवसायावरच नव्हे, तर अयोग्य पोलिसांवरही कारवाई करण्यात आली’, अशी माहिती यात देण्यात आली आहे.


हेही वाचा :