मुंबई : यंदाच्या बकरी ईदसाठी कुर्बानीकरता मुंबईतील देवनार कत्तलखान्यात बकऱ्या किंवा मेंढ्यांची कत्तल आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच याकरता जारी करण्यात आलेले परवानेही रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीय.

जीव मैत्री ट्रस्टच्यावतीने हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होईल. येत्या 23 ऑगस्टला मुंबईसह सर्वत्र बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मुंबई महापालिका यंदा देवनार कत्तलखान्याबाहेर बकरी ईदच्यानिमित्ताने बकऱ्या आणि मेंढ्यांच्या कुर्बानीसाठी ऑनलाईन परवानगी देत आहे. यावरही या याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.

अशा प्रकारे ऑनलाईन परवानगी मिळाल्यास फूटपाथ, सोसायटी, सार्वजनिक रस्ते, अशा कोणत्याही ठिकाणी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. असं केल्यास आरोग्याच्या समस्या, पर्यावरणच्या समस्या होतील तसंच जमिनीखालील पाणीदेखील खराब होण्याची भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

देवनार कत्तलखान्यात बकऱ्यांची कत्तल झाल्यानंतर उरलेल्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असते, पण बाहेर मात्र तशी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे बाहेर कत्तलीसाठी परवानगी नकोच अशी मागणी याचिकेत करण्यात आली आली आहे.

कत्तलखान्याबाहेर कुर्बानी देणं म्हणजे प्राण्यांविषयीचे कायदे, पर्यावरणाचे कायदे तसेच सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि मार्गदर्शक तत्व यांचंही उल्लंघन ठरेल, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

ऑनलाईन परवानगीमध्ये एका व्यक्तीस पाच बकऱ्या किंवा मेंढ्यांची कुर्बानी देता येते. असं झालं तर 10 व्यक्ती असलेलं कुटुंब 50 बकऱ्या किंवा मेंढ्यांची कत्तल करेल, अशी भीतीही याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन कर अदा केल्यावर कोणतीही शहानिशा न करताच कत्तलीची परवानगी मिळेल, असं याचिकेत म्हटलं आहे.