मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या यादीत केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव नसून, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचेही नाव आहे. दस्तुरखुद्द परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीच याची माहिती दिली आहे. मात्र, रावतेंनी आपलं नाव कसं आलं असाव, याचं स्पष्टीकरणही सोबत दिले आहे.

ई-चलनच्या थकबाकी यादीत मुख्यमंत्रीच नाहीत, तर माझंही नाव आलंय. मात्र साध्य मी वाहन चालवत नाही. माझ्या घरचं वाहन चालवत असताना नियमांचं उल्लंघन झालं असेल, असे दिवाकर रावते म्हणाले.

“वसुली का होत नाही, याची आजच्या रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कारणमीमांसा झाली. वाहन चालकांनी वाहन घेताना स्वतःच्या मोबाईल नंबरऐवजी एजंटचा नंबर दिला, तर सर्व नोटीस त्या एजंटला जातात. मी निर्देश दिलेत की, आता यापुढे वाहन घेताना एजंटचा नंबर नाही, तर मालकाचा नंबर घेणे अनिवार्य असेल. परंतु आता आमच्याकडे ज्यांचे पत्ते आहेत, त्यांना पोस्टाने नोटिसेस पाठवणार आहोत”, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली.

तसेच, मुख्यमंत्री असोत किंवा परिवहन मंत्री, कायदा सर्वांना सारखा आहे, असे सांगायलाही दिवाकर रावते विसरले नाहीत.

VIP व्यक्तींना परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट अनिवार्य करणार

"यापुढे VIP व्यक्तींना परवान्यासाठीही स्वतः ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल, अशा सूचना मी विभागाला दिल्या आहेत. शिवाय, कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आमच्या विभागाने सक्षमतेने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत” असेही दिवाकर रावतेंनी सांगितले.

आंबनेळी घाट दुर्घटनेनंतर सरकारला जाग

आंबनेळी घाट दुर्घटनेनंतर आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्यातील सर्व घाट रस्त्यांची पाहणी करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. यासाठी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमत त्यांनी सहा महिन्यात याबाबत अहवाल देण्याच्या सूचना परिवहनमंत्र्यांनी केल्या आहेत.

यामध्ये घाटातील जे भाग अपघातप्रवण असतील, त्याबाबतीत ही समिती उपाययोजना सुचवणार आहे. मुंबईत झालेल्या राज्य रस्ते सुरक्षा बैठकीत परिवहन मंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.