मुंबई : मुंबईतील मोहम्मद अली जिना यांचं ‘जिना हाऊस’ तोडून तिथे सांस्कृतिक केंद्र उभारावं, अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभेत माहिती दिली. तसंच संरक्षणमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.

भारताला तोडण्याचं प्रतिक असलेलं हे स्मारक त्वरीत उद्ध्वस्त केलं जावं, असंही मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. जिना यांच्या निवासा ठिकाणीच पाकिस्तानचं महावाणिज्य दूतावास उभारलं जावं, अशी पाकिस्तानची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र तसं काहीही न करता जिना हाऊस पाडण्यात यावं, अशी मागणी लोढा यांनी केली.

मुंबईतील जिना हाऊस या मलबार हिल येथील मोहम्मद अली जिना यांच्या निवासस्थानात पाकिस्ताचा वाणिज्यदूतावास सुरू करावा, ही मागणी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी मंगळवारी रेटली होती.

पाकिस्तानची ही जुनीच मागणी आहे. भारतानेही कराचीतील आपला दूतावास पुन्हा सुरू करावा, असं मतही त्यांनी मांडलं. परराष्ट्रमंत्रिपदाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 2002 ते 2007 या कालावधीत जिना हाऊसमध्ये पाकिस्तानी दूतावास सुरू व्हावा, यासाठी मी प्रयत्न सुरू केले होते, असं ते म्हणाले.

जिना हाऊस काय आहे?

जिना हाऊसची प्रमुख ओळख म्हणजे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं मुंबईतील निवासस्थान अशी आहे. मलबार हिलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अगदी समोर हा अडीच एकरावर हा भव्य बंगला आहे.

1936 मध्ये मोहम्मद अली जिना जेव्हा इंग्लंडहून कायद्याचं उच्चशिक्षण घेऊन भारतात परतले तेव्हा त्यांनी हा बंगला बांधला, असं बोललं जातं. जिना यांनी भारतात परतल्यानंतर मुस्लीम लीगचा कार्यभार सांभाळला आणि त्यानंतर हे घर बांधलं.

त्याकाळी हे घर बांधण्याचा खर्च जवळपास 2 लाख रूपये आला होता आणि घर संपूर्णपणे युरोपियन स्टाईलने बांधण्यात आलं होतं. त्याकरता इटालियन मार्बल आणि खास वॉलनटची लाकडंही मागवण्यात आली होती, असं बोललं जातं.

मात्र भारताच्या फाळणीनंतर जिना पाकिस्तानात गेले आणि त्यांची मुलगी दिना वाडिया, ज्या भारतात राहतात त्यांनी या घराच्या कायदेशीर वारस असल्याचा दावा केला. मात्र अद्याप हा बंगला केंद्र सरकारच्या ताब्यात आहे.

जिनांच्या जन्माआधी काही काळ त्यांचे वडील जिन्हाभाई पूंजा कराची इथे व्यवसायासाठी स्थलांतरीत झाले, कराची तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये येत होती.