मुंबई : महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलमधील वादाचा एक नवा अंक सुरु झाला आहे. दिल्ली स्पेशलने अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुळचा मुंबईचा आहे. जो अंडरवर्लड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमसाठी काम करत होता तेही आयएसआयच्या सांगण्यावरून. स्पेशल सेलच्या या कारवाईमुळे एटीएसच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र काल रात्री एटीएसने मुंबईतूनच याच केसमधील सातवा आरोपी झाकीर हुसैन शेख याला अटक केली आणि या अटकेच्या कारवाईमुळे दिल्ली स्पेशल नाराज झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जान मोहम्मदच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीमध्ये देखील झाकीर बद्दल माहिती मिळाली होती. झाकीरला अटक करण्यासाठी आयबीच्या सांगण्यावरून दिल्ली स्पेशल सेलची टीम मुंबईत दाखल झाली आणि एटीएसकडून अटक कारवाई करण्यासाठी मदत मागितली. पण एटीएसने झाकीरची माहिती घेऊन स्वःताच त्याला अटक केल्याचं दाखवलं आणि स्पेशल सेलला हवा असलेला आरोपी एटीएसने आपल्या ताब्यात घेतला.
या विषयी दिल्लीमध्ये देखील दोन्ही एजेन्सीमध्ये समन्वय का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच एटीएसने झाकीरवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केल्यामुळे त्याचा ताबा स्पेशल सेलला लवकर मिळणार नाही. त्यामुळे एटीएसच्या कारवाईने दिल्ली स्पेशल सेलच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण झाला असं मत स्पेशल सेलचं आहे.
या आधीही इंडियन मुजाहिद्दीनचा सर्वात मोठा अतिरेकी यासिन भटकळच्या अटकेवरुन महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलमध्ये वाद रंगला होता. दिल्ली स्पेशल सेलची टीम यासीन भटकळला अटक करण्यासाठी मुंबईत तळ ठोकून होती. एटीएसला याबद्दल माहिती मिळाली आणि ते स्वत: अटक करण्यासाठी भायकळा येथे पोहचले. पोलीस येत असल्याचं पाहून भटकळने तिथून पळ काढला आणि इतक्या मोठ्या दहशतवाद्याला अटक करण्याची संधी पोलिसांनी गमावली.
संबंधित बातम्या
- Mumbai Terrorist : दहशतवादी जान मोहम्मदचा हॅन्डलर झाकीर हुसेन शेख आहे तरी कोण?
- Terrorist Arrested : भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक, दोघांचं पाकिस्तानात ट्रेनिंग