मुंबई : यंदाच्या निवडणुकीत शिवसेना संपवण्याची भाजपची खेळी होती, मात्र ती खेळी अयशस्वी झाली आणि त्यांच्यावरच उलटली, असे म्हणत माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केसरकर आज कल्याणच्या नेवाळी परिसरात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.

शिवसेना भाजपची निवडणुकीत युती होती, मात्र तरीही भाजपचे गोव्यातील संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्याविरोधात माझ्या मतदारसंघात प्रचार करत होतं. अनेक ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवार लढवले, अपक्षांच्या जीवावर सत्ता आणत शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव होता, तो यशस्वी तर झाला नाहीच, पण त्यांच्यावरच उलटला, असा आरोप केसरकर यांनी केला आहे.

नारायण राणेंना भाजपमध्ये प्रवेश देणे, ही भाजपची खेळी होती, मात्र राणे जिथे जातात तिथल्या लोकांची सत्ता जाते, त्यामुळे त्यांची सध्या काहीच किंमत नसल्याचे म्हणत केसरकर यांनी नारायण राणे यांची खिल्ली उडवली.

दरम्यान, केसरकर यांनी कल्याणजवळच्या नेवाळीत येऊन अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली. नेवाळीची जमीन संरक्षण विभागाच्या नावावर असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास अडथळे येत आहेत. केसरकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.