Manhole Death in Gowandi: मुंबईतील गोवंडी परिसरातील शिवाजी नगर भागात मुंबई महानगरपालिकेकडून मॅनहोलमध्ये (manhole) सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही बऱ्याच भागामध्ये मॅनहोल सफाईसाठी माणसांचा वापर केला जातो. पावसाच्या दिवसामुळे मॅनहोलमधील मलनिस्सारण करण्याचे काम केले जात आहे. तेच काम गोवंडी परिसरात सुरु होते. 


सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण  निरंजन दास असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शिवाजी नगर येथील रस्ता क्रमांक 10 वर नव्याने पालिकेच्या कंत्राटदार कडून  मलनिस्सारणाचे काम करण्यात येत आहे. यावेळी मॅनहोलमध्ये आत जाण्यासाठी यातील एक कामगार उतरला. तो थेट आत मॅनहोलमध्ये पडला. त्याला मदत करण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी दुसरा कामगार देखील मॅनहोलमध्ये उतरला. त्यानंतर दुसरा कामगार देखील मॅनहोलमध्ये पडला. 


अग्निशमन दल आणि पोलीस दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या दोन्ही कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. मॅनहोलमध्ये प्राणवायूची कमतरता असते. दरम्यान मॅनहोलमधील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी लावण्यात आलेल्या मोटारमधून वीजेचा प्रवाह सुरु होता. त्यामुळे विजेचा झटका लागून या कामगारांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. परंतु अद्यापही या कामगाऱ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. 


या दोन्ही कामगारांचे मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविले असून शवविच्छेदन अहवालानंतर या दोन्ही कामगारांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. मात्र याप्रकरणात हलगर्जीपणा केल्याने कंत्राटदार आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत अनेक समस्या उद्भवतात. पावसामुळे रस्त्यावर खड्डे, पाणी तुंबणे, गटारं, मॅनहोल उघडी राहिल्याने होणारे अपघात अशा अनेक समस्या निर्माण होतात.


 तसेच मुंबईतील पावसाळ्यापूर्वी कामाचा भाग म्हणून दरवर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. यंदादेखील ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करुन दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु या कामामध्ये जराही हलगर्जीपणा झाल्यास तो कर्माचाऱ्यांच्या जीवावर बेतू शकतो. यामुळे या मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे देखील फार महत्त्वाचे आहे. दरम्यान या कर्मचाऱ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पाहणं आता गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


BMC Covid Scam : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर, जैस्वाल यांच्यानंतर आणखी 2 अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार?