कल्याण : इलेक्शन ड्युटी करताना महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. भगवान मगरे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगर महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.


भगवान मगरे यांची मतदानाच्या कामासाठी सी ब्लॉक भागातील एका शाळेत ड्युटी लागली होती. आज दुपारच्या सुमारास ते मतदानाचं साहित्य घेऊन मतदान केंद्रात आले, त्यानंतर जेवण करून पुन्हा काही कामानिमित्त बाहेर गेले. मात्र परत येऊन खुर्चीत बसताच उचकी येऊन ते खाली कोसळले. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.


उन्हामुळे हृदयविकाराचा झटका येऊन झाला त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.


काल परभणीत उष्माघाताने एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. विदर्भात तर पारा 47 अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे लहान मुलांसह वयोवृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.