मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरमध्ये उद्या 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत.

Continues below advertisement


कामगार विभागाच्या आदेशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व संबंधित आस्थापनांनी कामगारांना मतदासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत.


मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने आणि आस्थापने वगळता इतर सर्व आस्थापनांना उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाद्वारे अधिसूचना काढण्यात आली आहे.


तसेच बंद राहिलेल्या दुकाने/आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये असंही या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. या संदर्भात काही तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द लोकप्रतिनिधी अधिनियमान्वये कठोर कारवाई होऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे.


पुण्यात कमी मतदान झालं, मात्र मुंबईत मतदान 60% हून अधिक व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असंघटित कामगारांना भर पगारी सुट्टीचे निर्देश दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल.  जर कुणी सुट्टी नाही दिली तर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिला.