Dahihandi 2022 : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करत सरकारी नोकऱ्यांमध्ये गोविंदांना पाच टक्के आरक्षणाचा लाभ देण्याची घोषणा केल्यानंतर सरकारनं आता पुन्हा एक महत्वाची घोषणा केली आहे. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे. 


गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार











दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व  शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.


गोविंदांनाही नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा लाभ


दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. 


मृत आणि जखमी गोविंदांसाठी मदत


यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील.  दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या


Dahi handi 2022 : दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा


Dahi Handi 2022 : गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात दाखल गुन्हे मागे घेणार; राज्य सरकारची घोषणा